

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा
मावळ पंचायत समिती कार्यालयातील महिला कर्मचार्याच्या शासकीय कामात अडथळा करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत विनयभंग केल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी एकास अटक केली आहे. दरम्यान वडगाव न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दत्तात्रय पुताजी काजळे (रा.चिखलसे, ता.मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून याप्रकरणी पीडित महिलेने वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. 30) सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला.
मावळ पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेली पीडित महिला कर्मचारी या सोमवारी सायंकाळी पाच वाजता गटविकास अधिकारी यांच्या केबिनजवळ कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्याच्या कामासाठी जात असताना आरोपी काजळे याने त्यांना अडवून शासकीय कामात अडथळा आणला; तसेच पीडितेस अश्लील प्रश्न विचारत व विचित्र हावभाव करत पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, अशी आरोपीने वर्तणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वडगाव मावळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली असून वडगाव न्यायालयाने चार दिवसांनी पोलीस कोठडी सुनावली आहे.