

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च 2026 मध्ये घेण्यात येणार्या बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार (दि.8 सप्टेंबर) पासून सुरू होणार आहे. मंडळाने परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले नसले, तरी फेब्रुवारी महिन्याच्या दुसर्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. (Latest Pune News)
परीक्षेसाठी नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, खासगी उमेदवार, श्रेणीसुधार योजना, तुरळक विषय; तसेच आयटीआय (ट्रान्स्फर ऑफ क्रेडीट) घेणारे विद्यार्थी अर्ज दाखल करू शकतात. नियमित विद्यार्थ्यांनी आपली अर्ज प्रक्रिया ‘यूडायस प्लस’मधील पेन- आयडीवरून ऑनलाइन पद्धतीने संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत पूर्ण करावी. नोंद नसल्यास संपूर्ण माहिती भरून अर्ज भरता येणार आहे.
व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, खासगी विद्यार्थी व इतर पात्र गटांचे अर्जही प्रचलित पद्धतीने ऑनलाइन भरले जाणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांनी अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिल्या आहेत.