रवी कोपनर
कात्रज : महापालिकेच्या वतीने राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील कात्रज तलावातील गाळ काढून कडेला पक्ष्यांच्या अधिवासासाठी कृत्रिम बेट तयार करण्याचे नियोजन आहे. मात्र, उद्यान विभागाच्या अधीक्षकांना अंधारात ठेवून तलावातून काढलेला गाळ मध्यभागी टाकण्याचा प्रकार सुरू आहे. मध्यभागी गाळ टाकला जात असेल, तर त्याची चौकशी केली जाईल, असे उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले. बेट तयार करण्यासाठी आरसीसी फाउंडेशन आणि दगडी पीचिंग करून मुरमाचा भरावा देणे गरजेचे आहे. मात्र, हे काम न करता केवळ गाळाने बेट कसे तयार होईल, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महापालिकेने या तलावातील गाळ काढण्याचे काम जलसंपदा खात्याच्या यांत्रिकी विभागाला दिले आहे. गाळ काढून पाणी क्षमता वाढविण्यासाठी हे काम केले जात आहे. तसेच, काढलेल्या गाळाच्या माध्यमातून प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या सूचनेनुसार तलावाच्या कडेला परिसरातील पक्ष्यांच्या अधिवासासाठी बेट उभारण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. या कामावर नियंत्रण ठेवण्याचे काम मलनिस्सारण विभागाला देण्यात आले. गाळ तलावातून बाहेर काढून कडेला साठवणे अपेक्षित असताना तो मध्यभागी साठविण्यात येत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
याबाबत संबंधित अधिकार्यांना विचारले असता, तलावाच्या मध्यभागी कृत्रिम बेट तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, उद्यान विभागाच्या म्हणण्यानुसार हे बेट तलावाच्या कडेला तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी आरसीसी फाउंडेशन आणि दगडी पीचिंग करून मुरमाचा भरावा देणे गरजेचे आहे. मात्र, तसे सध्या होताना दिसत नाही. गाळ काढण्याच्या नावाखाली महापालिका प्रशासनाकडून जनतेच्या कररूपी पैशाचा चुराडा सुरू आहे. आयुक्तांनी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
माजी नगरसेवक युवराज बेलदरे म्हणाले की, या गंभीर प्रकाराबद्दल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी. बी. यांच्याशी बोलणे झाले असून, गुरुवारी मलनिस्सारण अधीक्षक, अभियंता यांना पाहणीसाठी बोलावले आहे. गाळ तलावातून बाहेर काढावा तसेच या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांच्याकडे करणार आहे.
या तलावाच्या कडेला पक्ष्यांच्या अधिवासासाठी बेट करावे, याबाबत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी. बी. यांच्यासोबत बैठक झाली आहे. याबाबतचा आराखडा येत्या दोन दिवसांत देण्यात येणार आहे. बेट तयार करण्यासाठी आरसीसी फाउंडेशन, दगडी पीचिंग करून मुरमाचा भराव टाकावा लागणार आहे. मात्र, तलावाच्या मध्यभागी हे बेट उभारता येणार नाही. कारण पावसाळ्यात त्या ठिकाणी पाणी येईल. हे बेट कमी पाण्याच्या ठिकाणी कडेला तयार करण्याचे नियोजन आहे.
अशोक घोरपडे, उद्यान अधीक्षक, महापालिका