शिरूर लोकसभा मतदारसंघात ही शांतता कसली? उमेदवारीचा तिढा कायम
शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा शिरूर लोकसभेत उमेदवार कोण असणार, या
घोषणेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यात भाजपची मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्याने जल्लोष आहे, तर बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या जाहीर सभांचा धडाका सुरू आहे. पण, शिरूर लोकसभा मतदारसंघात मात्र वादळापूर्वीची शांतता सध्या राजकीय वर्तुळात अनुभवायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपाचा तिढा कायम असला तरी ज्या जागांवर उमेदवार निश्चित झाले अशा सर्व जागेवरील उमेदवारांची दुसरी यादी भाजपने जाहीर केली आहे.
पुणे जिल्ह्यातील पुण्याची जागा भाजपला, मावळ शिवसेनेला तर बारामतीसह शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. सध्या पुण्याचे चित्र स्पष्ट झाले असून, बारामतीत देखील प्रचाराने जोर धरला आहे. परंतु शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर न झाल्याने मतदारसंघात प्रचंड शांतता निर्माण झाली आहे. शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित असून, कोल्हे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत महायुतीकडून उमेदवार कोण असेल याचे कोणतेही निश्चित नाव अद्यापही ठरत नाही. भाजपला व महायुतीला या वेळी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी व 'अब की बार 400 पार' करण्यासाठी एक-एक जागा महत्त्वाची मानली जाते. त्या पार्श्वभूमीवर ही जागा देखील अतिशय महत्त्वाची असणार आहे.
निवडणुकीत धक्कातंत्र वापरणार का याकडे लक्ष
शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीने पूर्ण ताकद लावली तर उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. यामुळेच शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निश्चित करताना कोणते धक्कातंत्र वापरणार, मतदारसंघातील सध्याची शांतता वादळापूर्वीची शांतता ठरणार का, याकडे आता संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा

