पिंपरी : स्मार्ट मीटरद्वारे जलव्यवस्थापनाचा नवा फंडा किती फायद्याचा?

पिंपरी : स्मार्ट मीटरद्वारे जलव्यवस्थापनाचा नवा फंडा किती फायद्याचा?
Published on
Updated on

मिलिंद कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने संपूर्ण शहरात योग्य प्रकारे पाणीपुरवठा करण्यासाठी सुपरवायजरी कंट्रोल अ‍ॅण्ड डाटा अ‍ॅक्काजिशन (स्काडा) प्रणाली सुरू केली. त्याचा फारसा उपयोग न झाल्याने ती प्रणाली कुचकामी ठरली. आता स्मार्ट सिटी कंपनीद्वारे विविध भागांतील 9 हजार 268 नळांना 'स्मार्ट वॉटर मीटर' लावण्यात येत आहेत. त्या माध्यमातून पाणीपुरवठा वितरण व व्यवस्थापनात सुधारणा होईल, असा दावा होत आहे. मात्र, स्मार्ट सिटीच्या तब्बल 140 कोटींच्या या नव्या प्रयोगामुळे फायदा होणार की तोटा हे येत्या 2 ते 3 महिन्यांत म्हणजे उन्हाळ्यात स्पष्ट होणार आहे.

संपूर्ण शहरात समन्यायिक पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मोठा गाजावाजा करीत स्काडा प्रणाली सुरू केली. शहरात तब्बल 35 टक्के पाण्याची गळती व चोरी होते. त्याचा शोध घेण्यात स्काडा प्रणाली फेल ठरली आहे. त्यामुळे तो प्रयोग फसल्याचा आरोप विरोधक करीत आहेत.

7 हजार 200 नळांना मीटर
शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थापन अधिक सक्षम व नियोजनपूर्वक करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने शहरातील 9 हजार 268 नळांना स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत एकूण 7 हजार 200 मीटर बसविण्यात आले आहेत. कामाची मुदत गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात संपली आहे. मुदत संपूनही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यासाठी 31 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

उर्वरित 2 हजार मीटर बसविण्याचे काम तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, कोरोना महामारीमुळे कामास विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या भागात मीटर बसविले नाहीत. तसेच, नव्याने विकसित झालेल्या भागात हे मीटर बसविले जात आहेत. ते काम कासवगतीने सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. स्मार्ट मीटरद्वारे पाणीचोरी व गळती रोखली जाते की, पूर्वीसारखीच स्थिती शहरात कायम राहते? हे येत्या उन्हाळ्यात स्पष्ट होईल.

कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरद्वारे पाण्याची माहिती मिळणार
स्मार्ट मीटरमुळे जागेवर जाऊन मीटर रीडिंग घेण्याची गरज राहणार नाही. स्मार्ट सिटीच्या निगडी येथील कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटरमध्ये सर्व मीटरचा डाटा कधीही पाहता येणार आहे. त्या माहितीच्या आधारे कोणत्या भागात किती पाण्याचा वापर होतो व इतर माहिती महापालिकेस उपलब्ध होणार आहे. त्या महितीचे विश्लेषण करून पाणीपुरवठा व्यवस्थापनात सुधारणा करणे. पाणीगळती थांबविणे. प्रमाणापेक्षा अधिक पाण्याचा वापर होत असल्यास अटकाव करणे आदींबाबत उपाययोजना केली जाईल, असा स्मार्ट सिटीचा दावा आहे. सर्व मीटर बसविण्याचे काम 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण केले जाणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.

स्मार्ट वॉटर मीटर
एकूण 9 हजार 268
बसविले 7 हजार 200
प्रत्यक्ष कार्यान्वित 2 हजार 300
शिल्लक 2 हजार 68

असे आहे स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट
स्काडा, जीआयएस मॅपिंग व फिक्स्ड वायरलेस नेटवर्कचा उपयोग करून तयार करण्यात आलेल्या पायाभूत व्यवस्थेच्या माध्यमातून पाण्याचा वापर व पाण्याची गळती याबाबत स्मार्ट वॉटर मॅनेजमेंटद्वारे माहिती घेतली जाते. स्मार्ट जलव्यवस्थापनामुळे प्रक्रिया न केलेले पाणी सामावून घेण्याच्या क्षमतेवर देखरेख ठेवणे, जलप्रक्रिया केंद्र व पंपिंग स्टेशनच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करणे, 24 बाय 7 पाणीपुरवठ्यासाठी नियोजन, आराखडा, जलव्यवस्थापन व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या विविध उपकरणांसाठी अंदाजे खर्च तयार करणे, एलिव्हेटेड स्टोरेज रिझर्वायर (ईएसआर) आणि ग्राउंड स्टोरेज रिझर्वायर (जीएसआर) यांची देखरेख करणे, स्वयंचलित मीटरच्या माध्यमातून घरगुती पाणी वापराचे मोजमाप केले जाणार आहे.

स्मार्ट वॉटर मीटर बसविण्याचे काम अजून सुरू आहे. सर्व मीटर बसवून झाल्यानंतर प्रत्यक्ष जे रिझर्ल्ट मिळणार त्यानंतर त्याबाबत अधिक बोलता येईल. शहराचा पाणीपुरवठा व्यवस्थापन सुधारण्यासाठी स्मार्ट मीटरची संकल्पना सहायभूत ठरावी असे अपेक्षित आहे.

     – श्रीकांत सवणे, पाणीपुरवठा विभागप्रमुख, सहशहर अभियंता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news