‘तू एवढी फिट कशी..? साल्सा करते की झुंबा..?’

‘तू एवढी फिट कशी..? साल्सा करते की झुंबा..?’
Published on
Updated on

पुणे : आयटी कंपनीत नोकरी करणारी अनिता ही बॉलिवूड नृत्य, तर कला शाखेत शिकणारी नीता ही कंटेम्पररी नृत्यप्रकार शिकत आहे.
आता म्हणाल त्यात काय विशेष..? तर त्या तरुणी फिटनेससाठी नृत्य शिकण्याकडे वळल्या आहेत. फिटनेस राखणे, वजन कमी करणे आणि मानसिक शांतता नृत्यातून मिळत असल्याने अनेकींचा नृत्याकडे कल वाढला असून, तरुणी शास्त्रीय नृत्यासह हिपहॉप, साल्सा, बेली डान्स, ब्रेक डान्स, झुंबा, असे नृत्यप्रकार शिकत आहेत. विविध क्षेत्रांत कार्यरत तसेच शिक्षण घेत असलेल्या 20 ते 35 वयोगटातील तरुणी नृत्य शिकण्याला प्राधान्य देत असून, नृत्य शिकणार्‍यांमध्ये 30 ते 35 टक्के प्रमाण तरुणींचे आहे.

फिटनेससाठी नृत्य शिकण्याचा फंडा वाढला आहे. काहीजणी ऑनलाइन वर्गाद्वारे, तर काहीजणी प्रत्यक्ष रोज दोन तास वर्गांमध्ये जाऊन नृत्य शिक्षण घेत आहेत. आयटी, डॉक्टर, वकील, कलाकार, सरकारी नोकरदार आणि व्यवसाय करणार्‍या तरुणी…अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील तरुणींचा नृत्य शिक्षणावर भर आहे. नृत्यदिग्दर्शिका निर्मिती सणस म्हणाल्या, महाविद्यालयीनच नव्हे, तर आताच्या घडीला विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणी नृत्य शिक्षण घेत आहेत. नृत्यातून तरुणींना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होत असून, एक वेगळाच आनंद त्यांना नृत्यातून मिळत आहे. भारतीय नृत्य प्रकार तरुणी शिकतच आहेत. त्याशिवाय पाश्चात्त्य नृत्य शिकणार्‍या तरुणींचे प्रमाणही जास्त आहे.

हा आहे नृत्याचा फायदा

जिमप्रमाणे कोणतीही अवजड साधने न उचलताही नृत्यामध्ये संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. केवळ शारीरिक नाही, तर मानसिक स्वास्थ्यही नृत्याने मिळते. नृत्य केल्याने हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. नृत्यामुळे संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. नैराश्येतून बाहेर पडण्यासाठी नृत्य चांगला पर्याय आहे. नृत्यामुळे मानसिक शांतता मिळते. मूड चांगला होतो. वजन कमी करण्यासाठी नृत्याची थेरपी उपयोगी आहे. असे कित्येक फायदे होत असल्यामुळे फिटनेससाठी तरुणी नृत्य शिकत आहेत.

फिटनेससाठी काही जणी पाश्चात्त्य नृत्य शिकत आहेत. या तरुणींसाठी आम्ही ऑफलाइन वर्ग घेत असून, आपल्या कामातून वेळ काढून त्या नृत्य शिकण्यासाठी येत आहेत.

– रत्नाकर शेळके, नृत्य दिग्दर्शक

सध्या फिटनेस राखण्यासाठी मी बॉलीवूड नृत्य शिकत आहे. त्याचा मला सकारात्मक फायदा झाला असून, नृत्यामुळे मूड चांगला राहण्यासह दिवसभर सकारात्मक ऊर्जाही राहते. माझ्या मैत्रिणीही आता
नृत्य शिक्षणाकडे वळल्या आहेत.

– नेहा आकीवाटे

हे नृत्यप्रकार शिकताहेत तरुणी

कंटेम्पररी, हिपपॉप, बेली डान्स, साल्सा, ब्रेक डान्स, लिरिकल, जॅझ, टॅप डान्स, रॉक अँड रोल, डिस्को, लॉकिंग अँड पॉपिंग आदी.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news