प्रसाद जगताप
पुणे : अत्याधुनिक सुविधांनी पुर्ण…नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून अद्ययावत केलेली सुरक्षा यंत्रणा… पर्यटकांना पहाण्यासाठी संपुर्ण ग्लास बॅरिअर्स (पारदर्शक काच)… आणि प्राणी संग्रहालयात प्रवेश केल्यावर लगेचच पहाता येईल, असे 'अॅनाकोंडा'चे निवास्थान बनविण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे.
प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने (सेंट्रल झू अॅथोरिटी) दिलेल्या परवानगीनंतर राजीव गांधी प्राणी संग्रहालय प्रशासन 'अॅनाकोंडा' हा अजस्त्र जातीचा साप पुण्यात आणण्याच्या तयारीला लागले आहे. आता कात्रजच्या बागेत या 'अॅनाकोंडा'च्या निवासस्थानासाठी खंदक उभारण्याचे काम सुरू झाले आहे. तर येत्या 2022-23 या कालावधीदरम्यान याच्या खंदकाचे काम पुर्ण होणार आहे.
मंजूरी मिळाल्यानंतर प्राणी देवाण-घेवाण योजनेअंतर्गत विदेशातून 'अॅनाकोंडा'ची भारतात आयात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्राणी संग्रहालयातील जागा निश्चित करण्यात आली असून, 'अॅनाकोंडा'सह संपुर्ण जुने सर्पोद्यान नव्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येणार आहे. निवासस्थानाचे काम पुर्ण झाल्यावर पुणेकरांना चार अॅनाकोंडा प्रजातीचे साप येथे पहाता येणार आहेत. बागेतीलच प्रस्तावित नव्या सर्पोद्यानात हे 'अॅनाकोंडा'चे निवासस्थान असणार आहे. असे राजीव गांधी प्राणीसंग्रहालय प्रशासनाने सांगितले.
1986 साली कात्रज येथे सर्पोद्यान उभारण्यात आले आहे. त्यानंतर कालांतराने पेशवे पार्कमधील प्राणी संग्रहालय कात्रज येथे स्थलांतरीत करण्यात आले. आता राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील जुने सर्पोद्यान प्राणी संग्रहालयातच स्थलांतरीत करण्यात येणार आहे. सुमारे 10 हजार स्क्वेअर मीटर परिसरात उभारण्यात येणार्या नव्या सर्पोद्याना 'अॅनाकोंडा'सह विविध निवडक सरपटणार्या प्रजातीचे प्राणी असणार आहेत. त्यात महत्वाचे म्हणजे अत्याधुनिक ग्लास बॅरिअर्स (संपुर्ण मजबूत काचेमध्ये) हे प्राणी पर्यटकांना पहायला मिळणार आहेत.
जुने सर्पोद्यान येत्या आर्थिक वर्षात बांधकाम पुर्ण करून स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे जुन्या सर्पोद्यानाची जागा रिकामी होणार आहे. या रिकाम्या झालेल्या जागेत पर्यटकांसाठी नवे खंदक तयार करण्यात येणार असून, यात माकड वर्गातील प्रजाती ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
प्राणीसंग्रहालयातीलच नव्या जागेत नवीन सर्पोद्यानाचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या आर्थिक वर्षात येथील सर्व काम पुर्ण होणार असून, 'अॅनाकोंडा'सह विविध सरपटणार्या प्रजातीचे प्राणी पुणेकरांना लवकरच पहायला मिळतील.
– अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधीक्षक, पुणे मनपा