पुणे : होर्डिंग्जच्या शुल्कवाढीची महापालिकेला आशा

पुणे : होर्डिंग्जच्या शुल्कवाढीची महापालिकेला आशा
पुणे; पुढारी वृत्तसेवा : न्यायालयाने एका खटल्यामध्ये होर्डिंग्जचा प्रति चौ. फूट भाडेदर 580 रुपये आकारावा, असे आदेश दिल्याने महापालिकेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. न्यायालयाच्या या आदेशाचा आधार घेत महापालिका होर्डिंगधारकांना 580 रुपये प्रति चौ.फूट परवाना शुल्क आकारण्यासाठी राज्य शासनाकडे परवानगी मागणार आहे.
शहर आणि समाविष्ट गावांमध्ये मोठ्याप्रमाणावर जाहिरातींसाठी होर्डिंग उभारण्यात आले आहेत. महापालिकेने होर्डिंगसाठीचा भाडेदर 111 रुपये प्रति चौ.फुटांवरून 222 रुपये केला होता. तर यावर्षी हा दर शहराच्या जुन्या हद्दीमध्ये 580 रुपये प्रति चौ.फू केला आहे.
दरम्यान, 222 रुपये दराविरोधात होर्डिंग व्यावसायिकांनी न्यायालयात दाद मागितली आहे. बर्‍याच काळापासून प्रलंबित असलेल्या या दाव्यामध्ये न्यायालयाने 111 रुपयांप्रमाणेच तूर्तास भाडे घेऊन परवानग्या द्याव्यात, असा अंतरिम आदेश दिला आहे. त्यानुसार महापालिकेने 111 रुपयेप्रमाणे पैसे भरून घेत परवाना नूतनीकरण केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयातील खटल्याचा अंतिम निकाल लागत नाही, तोपर्यंत 580 रुपयांऐवजी 111 रुपयांप्रमाणेच भाडे आकारणी करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. दरम्यान, भाडेदरावरून एका जाहीरात  कंपनीने महापालिकेविरोधात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील  सुनावणीमध्ये न्यायालयाने या जाहीरात  कंपनीला महापालिकेने आकारलेल्या दरानुसार भाडेशुल्क भरण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे महापालिकेला 580 रुपये दराने शुल्क आकारणीचा अधिकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचाच आधार घेऊन महापालिका 580 रुपये दराने भाडे आकारणीची परवानगी  मिळावी, यासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news