

पुणे: बेकायदा आणि चढ्या दराने गॅस सिलिंडर विकल्याप्रकरणी हिंजवडी येथील मे. श्री लक्ष्मी भारत गॅस या एजन्सीवर जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे. एजन्सीला तत्काळ पुरवठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, वितरणाचा परवाना देखील रद्द करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली. जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई ठरली आहे.
या एजन्सीकडे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर विक्रीचा अधिकृत परवाना आहे. मात्र, गुरुवारी (दि. 26) सिलिंडर वितरण करताना राज्य सरकारने ठरवून दिलेल्या प्राधान्यक्रमाचे पालन न करता अनधिकृत व नोंदणी नसलेल्या व्यक्तींना सिलिंडर वाटप केल्याचे आढळले. तसेच अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने जादा दराने सिलिंडर विक्री केल्याचेही निदर्शनास आले आहे.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एलपीजी पुरवठ्याबाबत गैरसमज निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तत्काळ कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार संबंधित एजन्सीचा परवाना निलंबित करण्यात येत आहे. तसेच, या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांना दिले आहेत.