

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शैक्षणिक क्षेत्रामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारताविषयीची कल्पना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभरातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवकांनी काम करावे, असे आवाहन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले. विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अधिवेशन आणि जी-20 परिषदेनिमित्ताने पुण्यात नजीकच्या काळात आयोजित शैक्षणिक उपक्रमांसाठीच्या उपक्रम अनावरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अधिवेशनाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजयकुमार, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राजेश पांडे आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, या वर्षी 5 लाख 13 हजार विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झाले आहेत. यात आणखी एक लाख विद्यार्थी वाढविण्याचा प्रयत्न आहे. प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी आभार मानले.
केसरकर म्हणाले, देशातील युवकांमध्ये श्रमप्रतिष्ठेविषयी जाणीव निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होणे शक्य आहे. जगाला एकीकडे कार्यकुशल मनुष्यबळाची असणारी गरज, तर दुसरीकडे तरुणांचा देश म्हणून असणारी भारताची एक वेगळी ओळख आपण सध्या अनुभवत आहोत. देशात श्रमाला प्रतिष्ठा मिळाल्यास, देशातील युवक हे केवळ देशासाठीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही कुशल मनुष्यबळ म्हणून उपयुक्त ठरू शकतील.