पुणे; पुढारी वृत्तसेवा: देशात पावसामुळे लांबलेल्या ऊसगाळप हंगामास आता सुरुवात झाली असून, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारखाने सुरू होण्याचे प्रमाण अधिक आहे. चालू वर्ष 2022-23 च्या हंगामात सुमारे 410 लाख टन साखरेचे उच्चांकी उत्पादन होण्याचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकनंतर उत्तर प्रदेशसह अन्य ऊस उत्पादक राज्यांतून नव्या ऊसगाळप हंगामास येत्या आठवड्यात सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. साखर वर्ष 2022-23 म्हणजे ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 या हंगामात देशात एकूण 3 हजार 600 लाख टनाइतके उसाचे विक्रमी गाळप अपेक्षित आहे. त्यातून 410 लाख टन साखरेचे नवे उत्पादन हाती येईल आणि ते उच्चांकी असेल, अशी माहिती त्यांनी दिली.
देशात गतवर्षातील म्हणजे 2021-22 या हंगामअखेरीस शिल्लक साखरेचा साठा 55 लाख टन आहे. चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनात इथेनॉलकडे साखर वळविल्याने 50 लाख टन साखर कमी होईल. देशांतर्गत साखरेचा खप 270 लाख टन असून, चालू वर्षी सुमारे 85 लाख टन साखरेची निर्यात अपेक्षित आहे. तर पुढील वर्षी म्हणजे हंगामअखेरीस देशात सुमारे 60 लाख टन साखरेचा शिलकी साठा राहील. जो देशातील पुढील तीन महिन्यांच्या स्थानिक खपासाठी पुरेसा राहील, असेही त्यांनी सांगितले.
जून 2023 पर्यंत ऊसगाळप हंगाम लांबण्याची शक्यता
उशिरा सुरू झालेल्या गाळप हंगामामुळे यंदाच्या वर्षीचा गाळप हंगाम महाराष्ट्रात जून 2023 पर्यंत लांबण्याची देखील शक्यता त्यांनी वर्तविली. महाराष्ट्रातील उसाच्या क्षेत्रात वाढ झालेली असून, परतीच्या पावसामुळे उभ्या उसाच्या वजनातही वाढ झाली आहे. त्यामुळे एकूणच नवा हंगाम विक्रमी गाळपाचा तसेच विक्रमी साखर उत्पादनाचा ठरू शकतो. महाराष्ट्रात 12.70 लाख टन, कर्नाटक 40 लाख टन, तमिळनाडू 5.06 लाख टन, याप्रमाणे देशपातळीवर एकूण 57 लाख 75 हजार टनाइतके ऊसगाळप पूर्ण झाले आहे. तर, सरासरी 7.01 टक्के उतार्यानुसार साखरेचे 4 लाख 5 हजार टनाइतके उत्पादन हाती आल्याची माहिती महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.