

पुणे: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बाबतचा द्वेष मनातून काढण्यासाठी दाखल याचिका वाचण्याचे आदेश न्यायालय राहुल गांधी यांना देऊ शकत नाही, असे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिका न्यायालयाने निकाली काढली.
या संदर्भात योग्य त्या न्यायाधिकरणाकडे दाद मागा, असा सल्लाही न्यायालयाने याचिकाकत्र्यांना दिला. मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने ही याचिका निकाली काढली. (Latest Pune News)
सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. तो सुनावणीसाठी प्रलंबित आहे. 29 जुलैपासून त्या खटल्याची नियमित सुनावणी होणार असून त्यामुळे याप्रकरणी पुन्हा नव्यानं सुनावणी घेण्याची गरज नसल्याचं नमूद करून ही याचिका निकाली काढताना मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केले आहे.
राहुल गांधी यांनी जनहित याचिका एकदा वाचावी. त्याबाबतचे निर्देश राहुल गांधी यांना देण्यात यावे, या मुख्य मागणीची याचिका डॉ. पंकज फडणीस यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.
राहुल गांधी यांविरोधात न्यायालयात अनेक खोटे दावे, खटले, याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यांना न्यायालयीन प्रक्रियेत गुंतवूण ठेवायचे तसेच खोटे गुन्हे दाखल करायचे हा एकच विरोधकांचा उद्देश आहे. पुण्यातील न्यायालयात बदनामीचा खटला सुनावणीसाठी आहे. असे असतानाही यास्वरुपाच्या याचिका दाखल करणे म्हणजे कायद्याचा व न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर आहे.
- अॅड. मिलिंद पवार, राहुल गांधी यांचे वकील