राहुल हातोले
पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर आगारामधील कार्यशाळेत कर्मचार्यांची संख्या कमी असल्याने मदतनीसांनाच सुपरवायझरचा कारभार सांभाळावा लागत आहे. एकूण 48 मंजूर पदांपैकी प्रत्यक्ष कार्यरत कर्मचार्यांची संख्या 28 आहे. त्यामुळे मदतनीसांनादेखील जिवाचा धोका पत्करून बस गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे करावी लागत असल्याची माहिती कर्मचार्यांनी नाव न छापण्याच्या अटींवर सांगितली.
वल्लभनगर आगाराच्या 52 बस तर बाहेरील आगारातील 160 अशा एकूण 212 बसेसची देखभाल दुरुस्ती, वाहनांमधील बिघाड, ऑईल तपासणीची कामे आगारातील कार्यशाळेत केली जातात. कार्यशाळेतील मनुष्यबळ कमी असल्याने कामाच्या दोन पाळींमध्ये किमान दोन सुपरवायझर/प्रमुख कारागीर असणे आवश्यक असताना आगारात केवळ एकच व्यक्ती कार्यरत आहे. परिणामी कामाचा जास्त वर्ष अनुभव असलेल्या कर्मचार्यास सुपरवायझर पदाचा कार्यभार सोपविला जात आहे. म्हणून आगारातील मदतनीसच सुपरवायझरची कामे करीत आहे. तर सहायकाकडून बसच्या दुरुस्तीची कामे करताना त्याच्या जोडीला सहाय्यक कारागीर व कारागीर क पदावरील कर्मचारी सोबत असणे आवश्यक असताना सहायक म्हणजेच मदतनीस एकटाच जिवाची जोखीम घेत काम करीत आहे. याच कारणामुळे गेल्या दोन आठवड्यांपूर्वी आगारात एका मदतनीसाचा अपघाती मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
कामावर हजर व गैरहजर कर्मचार्यांची नोंद ठेवणे.
कर्मचार्यांना कामाचे वाटप करून देणे.
कामाची वेळ पूर्ण होईपर्यंत सर्व कामे करून घेणे.
कामे पूर्ण झाली की नाही, याची तपासणी करणे.
कर्मचार्यांची संख्या कमी असल्याने काही मदतनीसाला एकट्यानेच सर्व दुरुस्तीची कामे करावी लागतात. हे काम करताना सहायक कारागीर आणि कारागीर क पदावरील व्यक्तीसोबत असणे आवश्यक असताना एकट्यालाच सर्व कामे करावी लागत आहेत. एक मदतनीस दररोज दिवसाला 40 ते 45 वाहनांची तपासणी करतो.
राज्य परिवहन महामंडळाने पदभरती केलेली नाही. त्यामुळे कर्मचार्यांची संख्या कमी आहे. परिणामी वय आणि अनुभव अधिक असलेल्या कर्मचार्यावर सुपरवायझरची कामगिरी सोपविली जाते.
– अशोक सोट, अतिरिक्त विभाग नियंत्रक, पुणे विभाग