पुणे: गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने पुणेकरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहू लागले असून, चौकाचौकांत पाणी साचले आहे.
सततच्या पावसामुळे रस्त्यावर खडी, माती आणि वाळू वाहून आली असून, ती ठिकठिकाणी पसरल्याने दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. उन्हं पडताच या खडी, मातीमुळे धूळ उडत असल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाने यावर अद्याप कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. (Latest Pune News)
महापालिकेकडून पावसाळी व सांडपाणी गटारांची स्वच्छता केली जाते. या प्रक्रियेत चेंबरभोवती जमा झालेली माती, खडी आणि कचरा उचलणे ही ठेकेदारांची जबाबदारी असते. तसेच, झाडलोट कामातही ही खडी वाळू बाजूला करण्याची जबाबदारी असते.
मात्र, प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांकडून रस्त्याच्या कडेला खडी व मातीचे ढीग टाकले जातात आणि ते दिवसेंदिवस उचलले जात नाहीत. परिणामी, पावसाळ्यात हे ढीग पुन्हा रस्त्यावर वाहून जात आहेत.
कात्रज-कोंढवा रस्ता तर अक्षरशः खड्डेमय झाला आहे. शहरातील पेठांसह प्रमुख रस्त्यांवर खडी वाळू आणि खड्ड्यांचे सामाज्य आहे. रस्ते झाडण्यासाठी मोठी यंत्रणा असूनही वेळेवर कारवाई न झाल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पुणे-सातारा रस्त्यावर विखुरलेली खडी, तुंबलेले चेंबर
पावसामुळे रस्त्यावर वाहून आलेल्या चिखल व खडीने भारती विद्यापीठ आणि बिबवेवाडी परिसरातील चेंबर तुंबले आहेत. बिबवेवाडी रस्त्यावर खडी व माती अजूनही काढलेली नाही. सातारा रस्त्यावर विशेषतः कात्रज डेअरीपासून कात्रज चौकापर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरली आहे. काही ठिकाणी चेंबर ओसंडून वाहत असून, नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
भुयारी मार्ग चिखलमय!
भारती विद्यापीठ व शिवाजीनगर येथील भुयारी मार्ग परिसरात पावसाच्या पाण्यामुळे मातीचे ढीग चिखलात रूपांतरित झाले आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, पादचाऱ्यांचीही गैरसोय होत आहे.
पावसामुळे रस्त्यावर वाहून आलेली खडी व माती उचलण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच शहरात खड्डेमुक्त मोहीम राबवली जाणार आहे.
- नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका