आळंदी: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यावर यंदा अतिपावसाचे सावट आहे. त्यामुळे या सोहळ्यासाठी हवामानाचा अंदाज लावून नदीच्या पाणीपातळीचा विचार करीत प्रशासनाला अधिक सतर्क राहावे लागणार असल्याची शक्यता आहे.
माऊलींचा पालखी प्रस्थान
सोहळा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. चार दिवसांपूर्वीच इंद्रायणीची पाणीपातळी चांगलीच वाढली आहे. दोन दिवसांपासून इंद्रायणी नदीपात्र परिसरात मावळपासून आळंदीपर्यंत पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अजूनही दोन दिवस अतिपावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Latest Pune News)
माऊली मंदिर आणि संपूर्ण आळंदीचा सोहळा हा इंद्रायणी नदी घाटाभोवती पार पडत असतो. या काळात इंद्रायणी नदी घाटावर अनेक वारकरी जमा होतात. हरिनामाच्या गजराने इंद्रायणी काठ दुमदुमून जात असतो.
काही वारकरी तर येथेच जागा भेटेल तिथे मुक्कामी असतात. शिवाय दर्शन बारीदेखील इंद्रायणी नदी ओलांडून उभारण्यात येत असते. इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पूल गेल्या महिन्यातच पहिल्या पावसात पाण्याखाली गेला होता. याच पुलावरून लाखो भाविक दर्शनबारीने माऊलींच्या दर्शनासाठी मंदिरात येत असतात. पाणीपातळी वाढून या पुलाला पाणी लागल्यास किंवा तशीच काही परस्थिती उद्भवल्यास भाविकांच्या जिवाला धोका उद्भवू शकतो.
सध्या स्कायवॉक पूल फॅब्रिक करून तात्पुरता देऊळवाड्याला जोडण्यात येत आहे, पण त्याचेही काम पावसामुळे संथ झाले आहे. अशी सर्व परिस्थिती असताना लाखोंचा समुदाय आळंदीत दाखल होणार असताना ऐनवेळीच्या उपाययोजना आखताना प्रशासन कमी पडताना दिसत आहे.
यंदा मान्सून राज्यात चांगलाच सक्रिय झाला आहे. मावळातून पाण्याचा मोठा लोंढा इंद्रायणीत येत असतो. यामुळे नदीची पाणीपातळी वाढते. भाविकांची संख्या विचारात घेता त्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न यंदा प्रशासनासमोर आहे.
यंदाच्या प्रस्थान सोहळ्यातील आव्हाने
भक्ती-सोपान पुलावरील दर्शनबारी ऐनवेळी बंद करावी लागणार.
स्कायवॉक पुलावर दर्शनबारी डायव्हर्ट करणे सुरक्षेच्या दृष्टीने कितपत योग्य, याचे अद्याप काम पूर्ण नसल्याने अनुमान नाही.
नदी पलीकडील पाच ते सहा हजार भाविकांची क्षमता असणारी दर्शनबारी ही तात्पुरत्या स्वरूपाची. अतिपावसात भाविकांचे प्रचंड हाल होणार.
स्कायवॉकचा दक्षिणेकडील सुरुवातीचा भाग देखील पाण्याखाली जाण्याची भीती. अशा वेळी दर्शनबारी पूर्ण बंद करावी लागणार.
भगीरथी नाला, भराव रस्ता, यामध्ये अतिपावसात भाविकांची कोंडी होऊ शकते.
शहरातील सांडपाणी, पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता अतिपावसात कुचकामी ठरते, अशा वेळी रस्ते पाण्याने तुंबणार.