फुरसुंगी: संकेत विहार, पॉवर हाऊस (फुरसुंगी) परिसरातील नागरिकांनी नागरी समस्यांसंदर्भात शनिवारी (दि.14) सकाळी फुरसुंगी नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र, या ठिकाणी प्रशासक व कर्मचारी नसल्याने संतप्त महिलांनी गेटवर बांगड्यांचा आहेर करून निषेध व्यक्त केला.
फुरसुंगीतील संकेत विहार, पॉवरहाऊस या परिसरातील नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर येथील रहिवाशांनी मार्च महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून फुरसुंगी, उरुळी नगरपरिषदेच्या प्रशासकांना या रहिवाशांच्या समस्या तातडीने सोडविण्याबाबत निर्देश दिले होते. (Latest Pune News)
मात्र, याबाबत कोणतेच समाधानकारक काम न झाल्याने येथील रहिवाशांनी स्वयंभू फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष हरपळे यांच्या नेतृत्वाखाली फुरसुंगी नगरपरिषदेवर निषेध मोर्चा काढला. मात्र, या वेळी नगरपरिषद कार्यालयाला टाळे असल्याचे पाहून आंदोलक संतप्त झाले.
त्यांनी प्रशासकाच्या विरोधात घोषणा देऊन कार्यालयाच्या गेटवर बांगड्यांचा आहेर करत, बॅनर झळकावत प्रशासकांविरोधात तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. या वेळी पॉवर हाऊस, संकेतविहार तसेच फुरसुंगी परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या परिसरात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. 18 ते 20 दिवसांनंतर याठिकाणी पाणी येते. या परिसरात ड्रेनेज लाईन फुटल्या आहेत. कचरा वेळच्या वेळी न उचलल्याने याठिकाणी ढीग साठले आहेत. रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हेच समजायला मार्ग नाही. परिसरातील विजेच्या तारा खराब झाल्याने अपघातांचा धोका संभवत आहे. कचरा डेपोलगतच हा परिसर असल्याने पावसाळ्यात अनेक साथीचे आजार परिसरात पसरत असतात. यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
कचरा डेपोला लागूनच संकेत विहार व पॉवरहाऊस हा भाग आहे, यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरी समस्या आहेत. मात्र, प्रशासकांकडून कामांबाबत चालढकल केली जात आहे. आज आंदोलन आहे. त्यामुळे प्रशासन व कर्मचारी कार्यालयाला कुलूप लावून गायब झाले आहेत. मात्र, प्रशासकांनी तातडीने येथील कामे न केल्यास यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाची आंदोलने करण्यात येतील.
- संतोष हरपळे, अध्यक्ष, स्वयंभू फाउंडेशन