

Maharashtra Monsoon Update
पुणे : मुंबई, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांत सोमवारी मान्सून दाखल झाल्याने मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात मोठा पाऊस झाला. मंगळवारीही तो त्याच ठिकाणी मुक्कामी होता. बुधवारी तो राज्याचा उर्वरित भाग व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, मंगळवारी (दि.28) दुपारी ओडिशा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात 31 मेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मात्र, १ जूनपासून पाऊस कमी होणार असल्याचाही अंदाज दिला आहे.
मुंबई, पुणे शहरात मान्सून दाखल होताच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू झाला. मुंबई पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून राज्यात लवकर आला. तो परिणाम क्षीण होत नाही तोच मंगळवारी दुपारी ओडिशा किनारपट्टीवर दुसरे नवे कमी दाबक्षेत्र तयार झाल्याने पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात 28 ते 31 मेपर्यंत सलग पाऊस नाही, काही जिल्ह्यांत 28 रोजी, तर काही ठिकाणी 30 रोजी खंड आहे. त्यामुळे पाऊस कमी होण्यास सुरुवात झाली असून प्रामुख्याने मुंबई, पालघर या भागांत 29 पासून पाऊस पूर्ण कमी होत आहे. राज्यात पाऊस 1 जूनपासून पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.
पुढील सहा ते सात दिवसांत पश्चिम किनारपट्टीवर (केरळ, कर्नाटक, महाराष्ट्राचा किनारी भाग आणि गोवा) मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. प्रामुख्याने राज्यातील सर्व घाटमाथ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सून सोमवारी मुंबई, पुणे, सोलापूर जिल्ह्यात एकाच वेळी आला. मंगळवारी तो याच भागात थांबला. आगामी दोन ते तीन दिवसांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्रातील काही भाग, कर्नाटकातील उर्वरित भाग व्यापणार आहे.
ऑरेंज अलर्ट : रायगड (28), रत्नागिरी (28, 29), सिंधुदुर्ग (28, 29), सातारा (घाट) (28), भंडारा (28), चंद्रपूर (28), नागपूर (28).
यलो अलर्ट : ठाणे (28), मुंबई (28), रायगड (29), रत्नागिरी (28, 29, 31), सिंधुदुर्ग (30, 31), धुळे (29), नंदुरबार (29), जळगाव (29, 30), पुणे (घाट) (29, 30, 31), कोल्हापूर (घाट) (29, 30), सातारा (घाट) (29, 30), छत्रपती संभाजीनगर (29, 30), जालना (29, 30), परभणी (29, 30), बीड (29), हिंगोली (29, 30), नांदेड (29, 30), लातूर (29), अकोला (29, 30), भंडारा (29, 30), बुलडाणा (29, 30, 31), चंद्रपूर (29, 30), गडचिरोली (29 ते 31), गोंदिया (29 ते 31), नागपूर (29 ते 31), वर्धा (29 ते 31), वाशिम (29 ,31), यवतमाळ (29, 30, 31).