

धनकवडी : गेल्या दोन- तीन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने धनकवडीतील सखल भागातील अनेक रस्त्यांवर पाण्याची डबकी साचत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनचालकांना, नागरिकांना, शाळकरी मुलांना या अनेक ठिकाणी साठलेल्या पाण्यातून मार्ग काढणे जिकिरीचे झाले आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, या खड्ड्यांमध्ये पाणी साठून राहिल्याने वाहने चालवताना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काश्मीर मैत्री (सरहद) चौकासमोर भारती विद्यापीठ पोलिस चौकीलगतचा रस्ता दोन-तीन महिन्यापूर्वीच वंडर सिटीपर्यंत केलेला आहे. मात्र येथून पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी साचत आहे.
कै. य. ग. शिंदे चंद्रभागा शाळेशेजारी, चंद्रभागा चौकासमोर, इच्छापूर्ती मंदिराच्या समोरच्या रस्त्यावर, जिजामाता चौक, सूर्या चौक ते तीन बत्ती चौकाकडे जाणार्या रस्त्यावर डबकी साचली आहेत. त्रिमूर्ती चौक ते जिजामाता चौकाकडून तीन बत्ती चौकाकडे जाणार्या रस्त्यावर पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्यात आले होते; परंतु हे काम निकृष्ट झाल्याने खड्ड्याच्या बाजूला खडी साठवून राहिली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर नुकतेच खड्डे बुजवण्यात आले, मात्र खडी बाजूला पडून खड्डे पडले असून त्यात पाणी साठले आहे.