

पारगाव; पुढारी वृत्तसेवा: सततच्या अतिपावसाचा फटका मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक या पालेभाज्यांना बसल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे पालेभाज्यांची पिके सडली आहेत. आता पालेभाज्यांना चांगला बाजारभाव मिळत असला, तरी या वाढलेल्या बाजारभावाचा शेतकर्यांना फायदा होत नसल्याचे विदारक चित्र आहे. परिणामी, शेतकरीवर्गात नाराजी दिसत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात कोथिंबीर, मेथी, शेपू ही पालेभाज्यांची पिके मोठ्या प्रमाणात शेतकरी घेतात.
सततच्या अतिपावसाचा फटका या पालेभाज्यांच्या पिकांना बसला आहे. सतत पडणार्या पावसाचे पाणी पालेभाज्यांच्या पिकांमध्ये साठून राहिल्याने पालेभाज्यांची पिके सडली आहेत. पालेभाज्यांवर पांढरे डाग, काळी टिक पडली आहे. त्यामुळे पालेभाज्या भुलण्याचे प्रमाण अधिक आहे. मर रोगाचा देखील मोठ्या प्रमाणात परिणाम पालेभाज्यांवर झाला आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे औषध फवारणीचा देखील काही उपयोग होत नाही.
रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे, शिंगवे, पारगाव आदी गावांमध्ये पालेभाजी पिकांवर रोगांचे सावट पसरले आहे. सध्या पालेभाज्यांना दर देखील चांगले मिळत आहेत. मेथीला शेकडा चार हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे, तर कोथिंबिरीला शेकडा नऊ हजार रुपये दर मिळत आहे. दर चांगले मिळूनही शेतकर्यांना त्याचा फायदा होत नाही. शेतकर्यांकडील पालेभाज्यांची पिके पावसात सडून नष्ट झाली आहेत.