

पुणे: राज्यात अतिवृष्टीमुळे अंदाजे 1 कोटी 1 लाख 24 हजार एकर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. सर्वांत जास्त नुकसान सप्टेंबर महिन्यात झालेले असून, या महिन्यातील नुकसानीच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, ते आव्हान आपल्यासमोर आहे. ते काम आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारला याबाबत सर्व माहिती द्यावी लागेल. केंद्राकडून लवकरात लवकर नक्की मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, राज्यात अतिवष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून राज्यातील कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी आपला एक दिवसाचा पगार हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहेत. तसे पत्र कृषी कर्मचारी संघटनेने माझ्याकडे दिलेले असल्याची माहिती भरणे यांनी सोमवारी (दि. 29) पत्रकारांशी बोलताना दिली. (Latest Pune News)
महाराष्ट्र राज्य राजपत्रित कृषी अधिकारी संघटनेचे (वर्ग 1) अध्यक्ष संजय काचोळे व शिष्टमंडळाने 350 अधिकाऱ्यांचा एक दिवसाचा पगार सुमारे 10 लाख रुपयांची मदत अतिवृष्टीग््रास्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देणार असल्याचे पत्र कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोमवारी दिले. या वेळी डावीकडून सुनील जाधव, सूरज मडके, संजय पिंगट, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, संघटनेचे अध्यक्ष संजय काचोळे, विजयकुमार राऊत, सुधीर नयनवाड, सतीश शिरसाट.
पुणे जिल्हा बँक देणार 26 लाख 51 हजार रुपये : प्रा. दुर्गाडे
राज्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे खरीप हंगामातील पिकांचे, जमिनीचे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत आलेला आहे. या शेतकऱ्यांना मदत म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बँकेच्या 1 हजार 22 कर्मचाऱ्यांचा एक दिवसाच्या पगारातून सुमारे 25 लाख 51 हजार रुपये आणि संचालकांच्या बैठकीचा भत्ता एक लाख रुपये मिळून सुमारे 26.51 लाख रुपयांचे धनादेश हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली. तसेच, याबाबतचा निर्णयही राज्याचे कृषिमंत्री आणि जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय भरणे हे सोमवारी (दि. 29) बँकेत आले असता तत्काळ त्यांना सांगितल्याचेही प्रा. दुर्गाडे यांनी सांगितले.