

पुणे: गेल्या पंधरा महिन्यांत शहरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 130 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर एकट्या बुधवार पेठेतून 52 जणांना पकडण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या 130 जणांना त्यांच्या देशात पाठवले (डिपोर्ट) आहे.
बांगलादेशी नागरिकांमध्ये महिलांची संख्या मोठी असून, वेश्याव्यवसायात दलालांनी त्यांना ढकलल्याचे आढळून आले आहे. बुधवार पेठ हे बांगलादेशी महिलांचे वास्तव्याचे केंद्र असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शहरात मागील पाच वर्षांत बेकादेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध एकूण 32 गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी 13 गुन्हे बुधवार पेठेत राहणाऱ्या बांगलादेशींविरुद्ध दाखल आहेत.
त्यामध्ये 79 जणांना अटक करण्यात आली आहे. सन 2020 ते 2021 या कालावधीत बांगलादेशी नागरिकांविरुद्ध दोन गुन्हे दाखल असून, त्यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. तर 2023 मध्ये तब्बल 11 गुन्हे दाखल करून 51 जणांना अटक करण्यात आली. मात्र, त्यातील एकालाही त्यांच्या मायदेशी पाठवले नसल्याचे दिसून येते. 2024 मध्ये फक्त 6 गुन्हे दाखल करून 9 जणांना अटक केली. मात्र, त्यांना परत पाठविण्यात आले नाही.
दरम्यान, मागील दोन वर्षांत पोलिसांनी बेकायदा वास्तव्यास असलेल्या बांगलादेशींविरुद्ध कडक कारवाईला सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे बुधवार पेठेत कोम्बिंग ऑपरेशन राबवून वेश्याव्यवसायत ढकलण्यात आलेल्या महिलांना अटक करीत तसेच त्यांना आश्रय देणाऱ्यांना देखील पोलिसांनी पकडले आहे. चार दिवसांपूर्वी खडक पोलिसांनी 15 बांगलादेशींना पकडले आहे.
2025 मध्ये 8 गुन्हे दाखल करून 15 जणांना अटक केली. मात्र, याच वर्षात तब्बल 77 जणांना मायदेशी पाठविण्यात आले, तर 2026 मध्ये चार महिन्यांत आतापर्यंत 5 गुन्हे दाखल असून, त्यातील 3 गुन्हे बुधवार पेठेत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींविरुद्ध दाखल करण्यात आले. त्यामध्ये दोन जणांना अटक केली आहे.
कुंटणखाने चालविणाऱ्या दलालांवर होणार कारवाई
कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या बहुतांश बांगलादेशी महिला बुधवार पेठेत मिळून आल्या आहेत. कुंटणखाने चालविणाऱ्या दलालांनी त्यांना वेश्यावस्तीत आश्रय दिल्याचे दिसून आले आहे. एवढेच नाही, तर काही महिलांकडे भारतात वास्तव्याचा पुरावा असलेली बनावट कागदपत्रे काढून दिल्याचे देखील पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
बांगलादेशींना बेकायदेशीर आश्रय देणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. नुकतीच सुमित चव्हाण नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. तो कशाप्रकारे बांगलादेशी महिलांना मदत करीत होता, याचा तपास पोलिस करीत आहेत.