

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहराच्या कमाल तापमानात गेल्या तीन दिवसांत 4 ते 5 अंशांनी वाढ झाली असून, मंगळवारी कोरेगाव पार्क 42.8, तर शिवाजीनगरचा पारा 39.2 अंशांवर गेल्याने शहरात आगामी चार दिवसांत आणखी प्रखर उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरावर ढगांची गर्दी असल्याने 24 एप्रिलपर्यंत सायंकाळी हलक्या पावसाचा अंदाजही पुणे वेधशाळेने दिला आहे.
यंदाच्या हंगामात संपूर्ण मार्च महिन्यात शहराचे कमाल तापमान 34 ते 37 अंशांवर होते. एप्रिलमध्ये ते सतत कमी-जास्त होत 37 अंशांवर स्थिर होते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्याचाही पारा 40 अंशांकडे जात आहे. मंगळवारी कोरेगाव पार्कचा पारा 42.8,
शिवाजीनगर 39.2, पाषाण 38.8, लोहगाव 39.5, चिंचवड 40.7, लवळे 36.5, मगरपट्टा 37.5 , वडगाव शेरी 41.2, बालेवाडी 40.2, एनडीए परिसर 39 अंशांवर गेला.
शहरात ढगाळ वातावरण आहे. हा परिणाम कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झाला आहे, त्यामुळे दिवसा कडक ऊन आणि सायंकाळी हलक्या पावसाची शक्यता आहे. शहरात असे वातावरण 24 एप्रिलपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
– प्रदीप राजमाने, वरिष्ठ शास्त्रज्ञ, पुणे वेधशाळा