पुणे; पुढारी वृत्तसेवा : सॉफ्टवेअर इंजिनिअर नयना पूजारी बलात्कार व हत्या प्रकरणात तिन्ही आरोपींना ठोठावलेली फाशीची शिक्षा कायम करण्याच्या अर्जासह निकालाविरोधात आरोपींनी केलेल्या अपिलांवर जानेवारीपासून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती केली आहे.
पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणार्या या खटल्यातील आरोपींना ठोठावलेली फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी (डेथ कन्फर्मेशन) राज्य सरकारने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे, तर तिन्ही आरोपींनीही या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यावर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या न्यायपीठापुढे जानेवारी महिन्यापासून सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील निंबाळकर यांनी दिली.
नयना पुजारी हिच्यावर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या आरोपींना पुण्याच्या विशेष न्यायालयाने मे 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरविले होते. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी हा निकाल दिला होता.