पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार बाजारात सद्य:स्थितीला जागोजागी कचर्याचे ढीग लागले आहेत. अवकाळी पावसामुळे कचरा भिजून त्यामधून दुर्गंधी पसरू लागल्याने बाजार घटकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत महापालिकेला शहरातील क्रॉनिक स्पॉट बंद करण्यात यश आलेले असताना दुसरीकडे बाजार समिती प्रशासनाला मात्र अपयश आल्याचे दिसून येत आहे. बाजार आवारात कचर्याचे वाढत चाललेले क्रॉनिक स्पॉट बाजार घटकांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. (Latest Pune News)
गुलटेकडी मार्केट यार्डातील गूळ-भुसार बाजारात राज्यासह परराज्यांतून माल दाखल होतो. त्याच्या खरेदीसाठी शहरासह राज्याच्या विविध ठिकाणांहून नागरिक येत असतात. अन्नधान्याच्या खरेदीसाठी येणार्या नागरिकांना सध्या बाजारात जागोजागी कचर्याचे दर्शन होत आहे. भुसार बाजारातील प्रत्येक लेनमध्ये तसेच प्रत्येक चौकामध्ये कचर्याचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहरात अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. त्यामुळे कचरा भिजून त्यामधून दुर्गंधीही येऊ लागल्याने बाजारघटक हैराण झाले आहेत. बाजारातील कचर्याच्या वाढत्या समस्येसंदर्भात दी पूना मर्चंट्स चेंबरने भुसार बाजारातील वस्तुस्थिती बाजार समितीच्या निदर्शनास आणून देत पत्रव्यवहार केला. मात्र, तरीही स्वच्छतेबाबत बाजार समिती प्रशासन कोणतीच कार्यवाही करीत नसल्याचे बाजार आवारातील कचर्याच्या ढिगांवरून दिसून येते.
भुसार बाजार आवारात कचरा गोळा करून ठेवला होता़. ठेकेदारामार्फत तो उचलून नेण्यात आला नव्हता. त्यामुळे कचरा उचलून नेण्याचा ठेका असणार्या ठेकेदाराला बाजार समितीकडून सक्त ताकीद देण्यात येणार आहे.
- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
भुसार बाजारातील कचरा वेळेवर उचलला जावा, यासाठी दी पूना मर्चंट्स चेंबरच्या वतीने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्र दिले आहे. बाजार आवारात कचरा असून, त्याची स्वच्छता व्हावी, याबाबत प्रशासनाशी देखील चर्चा झाली आहे़.
- रायकुमार नहार, अध्यक्ष, दी पूना मर्चंट्स चेंबर