

उरुळी कांचन(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पूर्व हवेली तालुक्यातही पक्षात दोन गट पडण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी भाजपच्या गोटात जाऊन शपथ घेतल्यानंतर पक्षाचे तरुण कार्यकर्ते हे उघडपणे, तर ज्येष्ठ नेते हे छुप्या पद्धतीने त्यांच्या भूमिकेचे समर्थन करताना दिसत आहे. अजित पवार यांच्या शपथविधीनंतर पूर्व हवेलीत अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत रांगा लावल्या आहेत. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणे अटळ झाले आहे.
भाजपच्या सरकारमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर पक्षावर दावा ठोकणार्या अजित पवार यांचा पूर्व हवेली तालुक्यातील प्रत्येक गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आहे. ते स्वतः 1992 पासून लोकसभेची निवडणूक लढल्यानंतर ते पूर्व हवेली तालुक्यात सक्रिय आहेत. त्यांना तालुक्यातील कृषी, सहकार, शिक्षण क्षेत्रातील परिपूर्ण माहिती आहे.
त्यांनी गेली तीन दशके सातत्याने तालुक्यातील विकासकामे उद्घाटने, भूमिपूजन तसेच सहकार क्षेत्रातील अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली आहे. अगदी तरुण सरपंचापासून ते खासगी कार्यक्रमांमध्ये ते आवर्जून उपस्थिती लावत. त्यामुळे तालुक्यातील त्यांचा जनसंपर्क कायम आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांच्या संपर्कातील हा सर्व वर्ग अजित पवार यांच्या पाठीशी दिसत आहे.
दुसरीकडे शरद पवार यांना मानणारा जुना वर्ग हा आजही त्यांच्याच पाठीशी असताना दिसत आहे. त्यांच्या भूमिकेशी सहमती दर्शविणारा एक वर्ग ही ठिकाणी कार्यरत आहे. प्रतिकूल संघर्षाच्या स्थितीत शरद पवार यांचा असणारा दृढआत्मविश्वास हा तरुणवर्गाला मोहीत करत असल्याने राष्ट्रवादीत एक फळी त्यांच्या पाठीशी उभी राहत असल्याचे एक चित्र तालुक्यात आहे.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे व आमदार अशोक पवार हे या भागाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या दोघांनी शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संघटनेत उभी फूट पडू नये म्हणून त्यांना कार्यकर्त्यांची मनधरणी करावी लागणार आहे. तालुक्यात अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने खासदार आणि आमदारासाठी पुढील काळ हा डोकेदुखी ठरू शकतो, अशी शक्यता दिसत आहे.
हेही वाचा