

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : 'हवेली तालुका बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल उतरणार आहे. मतदारांची चाचपणी करून सर्व जागा लढविणार आहे,' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विकास दांगट पाटील यांनी सांगितले. बाजार समितीच्या निवडणुकी साठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत महाविकास आघाडीचे एकत्रित पॅनेल होणार आहे.
मात्र, डोणजे (ता. हवेली) येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याकडे दांगट पाटील व समर्थकांनी पाठ फिरविल्याने आघाडीला सुरुंग लागल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी (दि. 27) राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपच्या सहकार्याने स्वतंत्र पॅनेल उभे करणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले. दरम्यान, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढविणार आहे. पक्षाचा दुसरा कोणताही पॅनेल नाही. नेत्यांनी कोणालाही पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट केले होते.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मतदारांची चाचपणी करून उमेदवार निश्चित करावे, असे सांगितले आहे. त्यांच्या नावाने कोणताही अपप्रचार केला जात नाही. उपबाजाराचा विकास करणे, ग्राहक व शेतकर्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी भौगोलिक समतोल साधून उमेदवार उभे केले जाणार आहेत.
– विकास दांगट पाटील, कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस