पुणे : हवेली बाजार समिती निवडणूक ; सर्वपक्षीय पॅनेलला राष्ट्रवादीचा नेता अनुकूल

पुणे : हवेली बाजार समिती निवडणूक ; सर्वपक्षीय पॅनेलला राष्ट्रवादीचा नेता अनुकूल

सीताराम लांडगे : 

लोणी काळभोर : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या मदतीने सर्वपक्षीय पॅनेल तयार करण्यास राष्ट्रवादीच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी संमती दिली असून, या पॅनेलमधील 17 जणांची नावेही निश्चित झाली असल्याचे समजते. या सर्वपक्षीय पॅनेलमध्ये भाजपच्या खडकवासला या बालेकिल्ल्यातीलच भाजप कार्यकर्त्यांना संधी नसल्याने त्यांच्यात अस्वस्थता आहे. या घडामोडीची सध्या हवेली तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपसह राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

राज्यातीलच नव्हे, तर देशातील सर्वांत मोठी सर्वार्थाने मलईदार असणार्‍या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या एकोणीस वर्षांपासून प्रशासकीय राज आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर कार्यकर्त्यांना ताकद मिळावी. भाजपचे आमदार वाढावेत म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या बाजार समितीची निवडणूक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर लावली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदारांचे भाजपचे गणित जमणार नाही, हे लक्षात आल्याने भाजपची अडचण ओळखून यातील पटाईत असलेल्या राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांनी आपले गणित बसविण्यासाठी हा सर्वपक्षीय पॅनेलचा तोडगा आपल्या अतिवरिष्ठ नेत्यांच्या आणि भाजपच्याही गळी उतरविला आहे, असे समजते.

या पक्षीय पॅनेलचा फॉर्म्युला वापरून जास्त जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात पडतील अशी खेळी राष्ट्रवादीच्या अतिवरिष्ठ नेत्याने खेळून भाजपवर मात केली आहे. सर्वपक्षीय पॅनेल तयार झाल्याची कुजबुज असून, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पॅनेलची घोषणा केली जाईल. परंतु, त्यापूर्वी संभाव्य उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे, उमेदवार नक्की झाले आहेत, आत केवळ औपचारिकता बाकी आहे. या पॅनेलमध्ये भाजपला 3 आणि शिवसेनेला 2 जागा देऊन त्यांची बोळवण करण्यात आली आहे.

या सर्व घटनाक्रमावरून राष्ट्रवादीच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी राजकीय डावपेच करीत एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. पवार कुटुंबीयांसाठी बारामती लोकसभा अत्यंत प्रतिष्ठेची व महत्त्वाची आहे. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये खडकवासला मतदारसंघात सुप्रिया सुळेंना कधीच आघाडी मिळाली नाही. या भागातील कमकुवत राष्ट्रवादीला लोकसभेला ताकद मिळावी तसेच विधानसभेची जागा राष्ट्रवादीकडे खेचून आणण्यासाठी या अतिवरिष्ठ नेत्याचा बाजार समितीचा डाव योग्य वेळी योग्य ठिकाणी पडला आहे. पश्चिम हवेलीत सर्वपक्षीय पॅनेलमध्ये राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांना स्थान मिळत असल्याची चर्चा आहे.

या तिघांना त्या नेत्यांनी ताकद दिली व यापैकी एक उमेदवार भाजपचे भीमराव तापकीर यांचा स्पर्धक आहे, हे नक्की. तसेच बाजार समितीच्या सर्वपक्षीय पॅनेलमध्ये भीमराव तापकीर यांच्या एकाही कार्यकर्त्याला संधी नाही व पश्चिम हवेलीत भाजपला जाणीवपूर्वक बाजूला ठेवून त्या नेत्यांनी सत्तेत नसताना भाजपबरोबर आघाडी करून भाजपच्या खेळीवर मात केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news