

Hasan Mushrif on Ajit Pawar Political Statement
पुणे : "पांडुरंग आमच्या पाठीशी आहे. लवकरच अजितदादांना पांडुरंगाची इच्छा असेल, तेव्हा पूजा करण्याची संधी मिळेल, असे सुचक विधान राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (दि.१८) केले. मंत्री मुश्रीफ यांनी देहू येथे संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त उपस्थिती लावली. संत तुकाराम महाराज मंदिर आणि शिळा मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.
ते पुढे म्हणाले, कोरोना बाबत आम्ही सतर्कता ठेवली आहे. वारकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची खबरदारी आरोग्य विभागाने घेतली आहे. कोरोनाचा सावट असले तरी घाबरण्याचे कारण नाही. कोरोनाला लोक धाडसाने सामोरे जातात आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील सद्यस्थितीवर विचारले असता, त्यांनी आमदारांची आणि खासदारांची एकत्र येण्याची इच्छा असल्याचे नमूद केले. मात्र, पवार साहेबांची इच्छा नसेल तर एकत्र येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. देहूत प्रथमच आलो असून, दरवर्षी वारीमध्ये असतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेवटी, मुश्रीफ यांनी पांडुरंगाला चांगल्या पावसासाठी आणि लोककल्याणासाठी प्रार्थना केली. "सर्वांना सुखी ठेव, पाऊस चांगला पडू दे, पावसामुळे नुकसान होऊ नये, सर्व लोक आनंदात राहावेत," अशी त्यांची प्रार्थना होती. संत तुकाराम महाराजांच्या या पावन भूमीतून दर्शन घेतल्याने आपण "पुण्यवान" झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.