

Hasan Mushrif on Shaktipith Highway
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळा शक्तिपीठ महामार्ग करणार असल्याचे सांगितले आहे. ज्या लोकांच्या तक्रारी असतील, ते सोडून शक्तिपीठ महामार्ग करण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला आहे. निवडणुकीपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ ची भूसंपादन प्रक्रिया रद्द करणारा अध्यादेश आम्ही काढला होता. अजूनही भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. तिथून महामार्ग जाऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही प्रयत्न करतोय. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध असून ही गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहे. परंतु, जिल्ह्यातील काही शेतकरी जादा दर मिळावा, म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
ते आज (दि.६) कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीचा २७ वा वर्धापन दिन पुणे येथे १० जूनरोजी साजरा करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
विशाळगडावरील उत्सव साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांची काल बैठक झाली आहे, यामध्ये तोडगा काढला आहे, अशी माहिती मला मिळाली आहे. सगळ्यांनी शांततेने आपले सण साजरे केले पाहिजेत, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
गोकुळच्या सर्व संचालकांना मुंबईला बोलवण्यात आले होते. पण काही अडचणी असू शकतात, म्हणून काही जण आले नाहीत. गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर मत व्यक्त करणार नाही. मात्र, मी हतबल झालो होतो. आता नवीद मुश्रीफ चेअरमन झाले आहेत. त्यांनी चांगले काम करावे, अशी अपेक्षा आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत ते म्हणाले की, राष्ट्रवादीचा जिथे जमेल तिथे सोबत आणि जिथे जमणार नाही तिथे त्यांच्या शिवाय असा पर्याय आमच्यासमोर आहे. आम्ही वर्तमानपत्रात वाचतोय दोघे ठाकरे बंधू एक होणार आहेत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.
वास्तविक लक्ष्मण हाकेंची फार मोठी चूक होती. अजित पवार यांच्यासारख्या ४० वर्षे राजकारणात असलेल्या व्यक्तीबद्दल असे बोलणे चुकीचे होते. अजितदादा आठ वेळा विधानसभेला निवडून आलेत. सहा वेळा उपमुख्यमंत्री झालेत. त्यांनी बारा वेळा अर्थसंकल्प मांडला आहे, अशा व्यक्तीबद्दल गोचीड म्हणून बोलणं योग्य नाही, त्यांना समज देण्याची आवश्यकता आहे.
अजितदादांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना अनेक वेळा सूचना दिल्या आहेत. ते मनमोकळ्या आणि भोळ्या बबड्या स्वभावाचे आहेत म्हणून ते अशी वक्तव्य करतात. यातून शेतकऱ्यांचा अपमान होतो, हे त्यांना समजत नसावे, यातून ते बोध घेतील आणि शेतकऱ्यांचा सन्मान करतील, असा विश्वास आहे. कोणत्या मंत्र्यांच्या विरोधात सदाभाऊ यांनी नाराजी व्यक्त केली, हे माहित नाही. मी त्यांना विचारेल आणि त्याप्रमाणे मी त्या मंत्र्यांना सूचना देईन.