पौड (ता.मुळशी); पुढारी वृत्तसेवा : पौड येथे मल्लिकार्जुन कुस्ती दंगल कुस्ती स्पर्धेत एक लाख एक्कावन्न हजार रुपये बक्षिसाच्या लढतीत महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याने समोरील पहिलवानास चितपट करत विजय मिळवला. स्पर्धेत अनेक लढतींनी डोळ्यांचे पारणे फेडले. कुस्तीरसिकांना पहिलवानांचे विविध डाव, उत्कंठावर्धक लढती पाहायला मिळाल्या.
पौड येथील पहिलवान अमित पिंगळे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे हे सातवे वर्ष होते. स्पर्धेचे उद्घाटन दत्तात्रय रुकर, माजी सरपंच संपत दळवी, संकेत दळवी, आशुतोष पिंगळे, किरण ढोरे, पोलिस पाटील संजय पिंगळे यांच्या उपस्थितीत झाले. सतपाल सोनटक्के व भैरव माने यांच्यातील कुस्ती रोमांचक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी झाली. सतपालने अत्यंत चपळाई दाखवत गदालोड डाव टाकत भैरवचा पराभव केला. सतपालला एक लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. शुभम कोळेकर व रोहित जवळकर यांच्या लढतीत रोहितच्या हाताला मार लागल्यामुळे लढत बरोबरीत सोडवण्यात आली.
धनंजय दाभाडे यांच्या स्मरणार्थ मल्लिकार्जुन किताबासाठी अभिजित भोईर व अनिकेत कंधारे यांच्यात सुमारे पाऊण तास लढत झाली. शेवटच्या टप्प्यात अभिजितने चाट डाव टाकत अनिकेतला आस्मान दाखवले व मल्लिकार्जुन किताब, चांदीची गदा, रोख बक्षिसाचा मानकरी ठरला. लहान गटातील चैतन्य पिंगळे व धिरज शिंदे यांच्यात रंगतदार लढत झाली.
स्पर्धेचे बक्षीस वितरण युवानेते मधुर दाभाडे, प्रकाश भंडारी, उद्योजक योगेश शहापुरे, किरण आग्नेन, राजू रसाळ आदींच्या उपस्थितीत झाले. कोल्हापूर येथील वस्ताद विश्वास हरगुले यांनी कुस्तीपटू, पहिलवान घडवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांनाही गौरविण्यात आले. पंच म्हणून नरेंद्र मारणे, सतीश ववले आदींनी काम पाहिले. निखिल रुकर, अक्षय घारे आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
लढत लावण्यासाठी महिला आखाड्यात
महिला कुस्तीपटू प्रगती गायकवाड व धनश्री फंड यांच्यात अटीतटीची लढाई झाली. अखेर प्रगतीने लपेट डाव टाकत धनश्रीवर विजय मिळवला. महिलांची कुस्ती पाहण्यासाठी रुपाली पिंगळे, राजश्री केचे, राजश्री पिंगळे आदी महिलांनी मैदानावर हजेरी लावली होती.