

मिलिंद शुक्ल
पिंपरी : गुढीपाडव्यापासून शालिवाहन शके 1945 या नववर्षाला सुरुवात झाली आहे. तसेच नववर्ष सुरू झाले की साधारण लगीनघाईही आपल्याकडे सुरू होते. या 2023 ते 24 अशा नवीन हिंदू वर्षातील सात महिन्यांत 64 मुहूर्त आहेत. अक्षयतृतीया, देवउठनी एकादशी, वसंत पंचमी आणि आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील भडली नवमी हे ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातील चार शुभ दिवस आहेत. या दिवशी मुहूर्त न पाहताही लग्न किंवा धार्मिक विधी करता येतात. दुसरीकडे विवाहासारख्या शुभ कार्यासाठी शुक्र ग्रह उदय स्थितीत असणं आवश्यक आहे. येणार्या नववर्षात एकूण 64 शुभ मुहूर्त आहेत. हे शुभ मुहूर्त मे 2023, जून, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 2024, फेब्रुवारी व मार्च या महिन्यात आहेत.
या वर्षात असे आहेत मुहूर्त
2023-24 या वर्षातील एप्रिल ते मार्च या दरम्यान 31 मार्च 28 एप्रिलपर्यंत गुरुलोप असल्याने मुहूर्त नाही. मे महिन्यात 14, जून महिन्यात 11, नोव्हेंबर महिन्यात 5 आणि डिसेंबर महिन्यात, तसेच 2024 मधील जानेवारी 8, फेब—ुवारी 10 आणि मार्च 9, असे 64 शुभ मुहूर्त आहेत.
खर्चाचे गणित
आता खर्चाचे गणित आपण कसे किती खर्च करू शकतो, यावर अवलंबून आहे. विवाह आपण कोणत्या पद्धतीने म्हणजे पारंपरिक की वैदिक पद्धतीने करतो यावर विधींची संख्या वाढते.
मंगल कार्यालये
आता मंगल कार्यालयांचे नियोजन करण्यास घेतले तर घोडा, बँडवाले, पुष्पहार, डेकोरेशन, नाश्ता, चहा आणि जेवण, तसेच सर्व धार्मिक विधींचे असे एक पॅकेजच एक दिवसाचे 150 जणांसाठी साधारण एक ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. आता तुमचे लग्नासाठी माणसे वाढत असतील तर त्या पटीत या खर्चात वाढ होईल. बहुतेक कार्यालयांचे ही पॅकेजेस ही आपल्या निवडीप्रमाणे ठरू शकतात, अशीच आहेत.
असा बदलू शकतो खर्च
विवाहाच्या या खर्चातील काही खर्च आपल्याला कमी करता येतो. यातील काही विधी हे घरगुती पद्धतीने घरी करून महत्त्वाचे विधी कार्यालयात करावे,म्हणजे खर्चात तेवढी बचत करता येईल.
विवाह एक संस्कार
हिंदू धर्मातील विवाहाला अनन्य साधारण महत्त्व !हिंदू धर्मात मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार सांगितले आहेत. त्यापैकी विवाह हा एक संस्कार आहे. सध्याचे विवाहाचे बदलते स्वरूप पाहता हा एक संस्कार राहिला नसून केवळ सोहळा म्हणून समाजात अधिकाधिक साजरा करण्याची पद्धत रूढ होत चालली आहे. परंतु, विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन असून तो योग्य पद्धतीत साजरा होणे अपेक्षित आहे.
विवाह मुहूर्त
या वेळी सुक्षातून देवता वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी येत असल्याने तो मुहूर्तावर होणे अपेक्षित आहे. या उलट बहुसंख्य ठिकाणी आज मुहूर्त पाळला जात नसून त्या आधी नाचणे, सत्कार आणि विविध प्रकारे कृती केल्या जातात.
खर्चिक प्रकार वाढले…
विवाह करताना वधू आणि वर यांवरती धर्मशास्त्रानुसार संस्कार होणे महत्त्वाचे असते. परंतु सध्या हा भाग लोप पावत चालला असून सजावट करणे, फटाके उडविणे, प्रचंड प्रमाणात खर्च करणे आणि स्पर्धा करणे, असे खर्चिक प्रकार वाढले आहेत.
आज प्रत्येकाकडे वेळेचा अभाव आहे. त्यामुळे लग्नकार्य करताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व कंत्राटी पद्धत देऊन विवाह संपन्न होतो. यामध्ये या सर्व गोष्टी हळूहळू लोप पावत आहेत. विवाह करताना समाजातील मान्यवरांचा सन्मान करणे त्यांच्याकडून आशीर्वाद घेणे या गोष्टींना महत्त्व न देता संस्कारांना अधिक महत्व द्यायला हवे. विवाह हा साध्या पद्धतीत आणि योग्य संस्कार करूनच करायला हवा.
– सुनील ओजाळे, सामाजिक कार्यकर्ते