

हडपसर : पुढारी वृत्तसेवा : हडपसर परिसरातील एका चारमजली इमारतीवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी बांधकाम विभागाने गुरुवारी (दि. 9) कारवाई केली. यामुळे इतर अनधिकृत बांधकाम करणा-यांचे धाबे दणाणले आहे. माळवाडी येथील चारमजली इमारतीवर महापालिकेने जेसीबी मशीनच्या साह्याने कारवाई करत इमारत पाडण्यात आली तर भाजी मंडईशेजारी दुकानदारांच्या 3 हजार स्क्वेअर फुटाच्या पत्र्याच्या दुकानावरही कारवाई करण्यात आली. या वेळी महापालिकेच्या कर्मचा-यांसह कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हडपसर-माळवाडी रोडवरील सर्वे नंबर 209, ओरिएंट गार्डनशेजारी पार्किंगसह चार मजली अनधिकृत बांधकाम होत असल्याने महापालिकेच्या अधिकार्यांनी बांधकाम थांबवण्याची नोटीस दिली होती. मात्र, इमारतीचे मालक शैलेश तुपे यांनी महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाने गुरुवारी सकाळी जेसीबी मशीनच्या साह्याने पोलिस व कर्मचारी यांच्या उपस्थितीत कारवाई केली.
यानंतर हडपसर गावातील भाजी मंडईच्या शेजारच्या रस्त्यावरील दुकानांवरही जेसीबीच्या साह्याने कारवाई करण्यात आली. वाहतुकीला अडथळा ठरणारी ही पत्र्याची दुकाने येथून हटवण्यात आली. ही कारवाई पालिकेचे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता रमेश काकडे व शाखा अभियंता विजय दाभाडे यांनी केली.
माळवाडी मधील चार मजली इमारतीच्या मालकांना वारंवार नोटिसा दिल्या होत्या. मालकाने पालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष केले. पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने कारवाई केली. महापालिकेने नेमून दिलेल्या नियमानुसारच बांधकामे करावीत. हडपसर भागामध्ये जिथे जिथे अनधिकृत बांधकाम आहेत त्या ठिकाणची माहिती घेऊन कारवाई करणार आहोत. हडपसर उपनगर भागात नियमबाह्य बांधकामे वाढली आहेत.अशा इमारतीवर कारवाई सुरुच राहील. बांधकाम परवाना व पालिकेचे नियम पाळणे तितकेच महत्त्वाचे आहे.