

पुणे : लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी परत येताना प्रवासी मिळत नाहीत, असे सांगत अनेक रिक्षाचालक पुण्यात 'हाफ रिटर्न' भाड्याच्या नावाखाली प्रवाशांची लूट करीत असल्याचे समोर आले आहे. आरटीओच्या नियमानुसार 'हाफ रिटर्न' भाडे हे केवळ मध्यरात्रीच्या वेळी घेणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक रिक्षाचालक दिवसाही प्रवाशांकडे 'हाफ रिटर्न' भाड्याची मागणी करीत आहेत. शहरात पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसोबतच रिक्षामार्फतसुध्दा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविली जात आहेत.
आरटीओने दिलेल्या नियमाप्रमाणे मीटरनुसार रिक्षातूनही प्रवासी वाहतूक केली जात आहे. परंतु, पुण्यात तसे होत नसल्याचे दिसत आहे. लांब पल्ल्याचे भाडे मिळाल्यास काही रिक्षाचालक प्रवाशांकडून 'हाफ रिटर्न' भाड्याची मागणी करीत मीटरने झालेल्या भाड्यापेक्षा अतिरिक्त पैशांची मागणी करीत आहेत. पैसे न दिल्यास भाडे नाकारत आहेत. त्यासोबतच प्रथमत: लांबचे भाडे म्हटले तर नको रे बाबा म्हणत असल्याचे चित्र दिसत आहे.
'हाफ रिटर्न' भाड्याच्या नावाखाली लूट होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर प्रतिनिधीने तीन हत्ती चौक ते नांदेड सिटी, वडगाव बु. असा मंगळवारी सकाळी रिक्षाने प्रवास केला. या वेळी अनेक रिक्षाचालकांनी लांबचे भाडे म्हटल्यावर भाडे नाकारले. त्यानंतर एक रिक्षाचालक आला. मात्र, त्याने बसण्यापूर्वी प्रतिनिधीला हाफ रिटर्न भाड्याची कोणतीही कल्पना न देता उतरल्यावर मीटरपेक्षा अतिरिक्त असलेल्या 'हाफ रिटर्न' भाड्याची मागणी केली. असे प्रकार शहरात सर्रासपणे सुरू असून, आरटीओने ते रोखावेत, अशी मागणी पुणेकरांकडून केली जात आहे.
रिक्षाचालकांनी दिवसा 'हाफ रिटर्न' भाडे आकारणे चुकीचे आहे. असे केल्यास मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक आणि वाहनजप्तीची कारवाई होऊ शकते. रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रिक्षाचालकांना 'हाफ रिटर्न' भाडे आकारण्यास परवानगी आहे. फक्त रात्रीच भाड्याच्या 25 टक्के अतिरिक्त पैसे आकारण्यास परिवहन विभागाकडून रिक्षाचालकांना परवानगी देण्यात आली आहे.
व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रार करा…
पुणे आरटीओने मनमानी भाडे आकारणार्या वाहनचालकांची तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक तयार केला आहे. या क्रमांकावर प्रवाशांनी अतिरिक्त भाडे आकारल्याच्या तक्रारी कराव्यात. आरटीओकडून संबंधित रिक्षा/बस/टॅक्सी चालकांवर कडक कारवाई करण्यात येईल. याबाबतची तक्रार प्रवाशांनी 8275330101 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर करावी. तक्रार करताना प्रवाशांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक, प्रवास मार्ग, रिक्षा क्रमांक, रिक्षाचा फोटो, जमल्यास मीटर भाड्याचा फोटो, असा तपशील पाठवावा, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.
'हाफ रिटर्न' भाडे आकारण्यास फक्त मध्यरात्रीच्या वेळीच परवानगी आहे. रिक्षाचालकांनी दिवसा प्रवाशांकडे 'हाफ रिटर्न' भाड्याची मागणी करू नये. असे केल्यास प्रवाशांनी संबंधित रिक्षाचालकाची आमच्याकडे तक्रार करावी. संबंधित रिक्षाचालकावर तत्काळ कारवाई करण्यात येईल.
– संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
दिवसा 'हाफ रिटर्न' भाडे आकारून रिक्षाचालकांनी प्रवाशांची फसवणूक करू नये. 'हाफ रिटर्न' म्हणजेच दीडपट भाडे फक्त मध्यरात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंतच आकारण्यास परवानगी आहे. अशा प्रकारे प्रवाशांची फसवणूक करून इतर रिक्षाचालकांचे नाव बदनाम करू नये.
– आबा बाबर, संस्थापक अध्यक्ष, शिवनेरी रिक्षा संघटना
हेही वाचा