

पुणे: गुन्हे शाखेच्या पथकाने हडपसर परिसरातून घरफोडी करणाऱ्या एका सराईताला अटक केली. त्याच्याकडून पिस्तुलासह सोन्याचे दागिने असा १८ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात चोरट्याने घरफोडीचे तीन गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. (Latest Pune News)
हंसराज सिंग ऊर्फ हँसू रणजितसिंग टाक (वय १९, रा. तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. टाक हा सराईत चोरटा आहे. त्याने घरफोडीचे गुन्हे केले असून, तो तुळजाभवानी वसाहतीत येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलिस कर्मचारी कानिफनाथ कारखेले आणि नितीन मुंढे यांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून टाकला पकडले. त्याच्या घराची झडती घेतली. तेव्हा त्याच्या घरातून पिस्तूल, काडतुसांचे मोकळे मॅगझीन, काडतूस, १७ लाख ८१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा १८ लाख २२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. टाक याने सहकारनगर, पिंपरी-चिंचवडमधील चिखली, भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, नीलेश साळवे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, सचिन पवार, निर्णय लांडे, नेहा तापकीर यांनी ही कामगिरी केली.