पिंपरी : गुटखाबंदीची नौटंकी; टपरी, किराणा दुकानातही होतेय सर्रास विक्री

पिंपरी : गुटखाबंदीची नौटंकी; टपरी, किराणा दुकानातही होतेय सर्रास विक्री
Published on
Updated on

दीपेश सुराणा

पिंपरी(पुणे) : राज्यात गुटखाबंदी असूनही, पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या गुटखा, सुगंधित तंबाखू यांची विक्री सध्या सर्रास सुरू आहे. पानटपरीपासून ते थेट किराणा दुकानदारापर्यंत सगळीकडे सुगंधित तंबाखू, सुगंधी सुपारी सहज मिळत आहे. एफडीएकडून याबाबत कारवाई होत असली तरी अपुर्‍या मनुष्यबळामुळे त्यावर मर्यादा येतात, त्यामुळे राज्यात खरोखरच गुटखाबंदी आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.

राज्य सरकारने 20 जुलै 2012 रोजी गुटखा बंदीचा निर्णय घेतला. राज्यामध्ये गुटखा बंदी लागू होऊन दहा वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही कडक अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. पर्यायाने, गुटखा बंदी ही कागदावरच राहिली आहे. गुटखा विक्रेत्यांनी मार्ग शोधत पानमसाला आणि सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी अशी विक्री सुरू केली आहे. मात्र, सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी याच्यावर देखील राज्यात बंदी आहे.

'एफडीए'कडून कारवाईवर मर्यादा

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) वतीने पिंपरी-चिंचवड शहरात अशा पद्धतीने विक्री करण्यात येणार्‍या सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारीबाबत कारवाई करण्यात येते. त्याचप्रमाणे, खर्रा किंवा मावा यावरदेखील बंदी असल्याने त्याबाबतदेखील कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, एफडीएकडे पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची सध्या कमतरता जाणवत आहे. त्यामुळे या कारवाईवर मर्यादा येत असल्याचे एफडीएचे सहायक आयुक्त अर्जून भुजबळ यांनी सांगितले.

पोलिसांनाही कारवाईचे अधिकार

बेकायदा गुटखा, सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी यांच्या विक्रीला प्रतिबंध आहे. तसेच, याबाबत कारवाई करण्याचे पोलिसांनादेखील अधिकार देण्यात आले आहे. एफडीएकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. मात्र, पोलिसांकडे मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात आहे. त्यामुळे पोलिसांमार्फत याबाबत कारवाई व्हायला हवी.

गुटखा, सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी, खर्रा किंवा मावा यांच्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई केली जाते. मात्र, एफडीएकडे पुण्यासाठी केवळ 11 जणांची टीम उपलब्ध आहे. अपुरे मनुष्यबळ असल्याने कारवाईवर मर्यादा येतात. पोलिसांनाही कारवाईचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून देखील कारवाई शक्य आहे.

                                             -अर्जून भुजबळ, सहायक आयुक्त,
                                          अन्न व औषध प्रशासन विभाग (पुणे)

गुटखा, तंबाखू खाल्ल्याने कर्करोग होण्याची शक्यता आणि प्रमाण वाढते. ज्यांना याचे व्यसन जडते त्यांना तोंड न उघडण्याची समस्या निर्माण होते. गुटखा, सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू, मावा खाणे असे सर्वच व्यसन आरोग्यासाठी घातक आहे. या व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे.

                              – डॉ. अनिकेत लाठी, कान-नाक-घसा तज्ज्ञ,
                              यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (पिंपरी)

गुटखा विक्रेत्यांची साखळी

महाराष्ट्रात शेजारील राज्यातून विशेषतः कर्नाटकमधून गुटखा विक्रीसाठी आणला जातो. साखळी पद्धतीने हा माल विक्रेत्यांपर्यंत पोचवला जातो. पानटपरीचालक, चहा विक्रेते किंवा किराणा दुकानदार अशा सर्वच ठिकाणी पानमसाला, सुगंधी तंबाखू, सुगंधी सुपारी यांच्या पुड्या विक्रीस असल्याचे चित्र पाहण्यास मिळते. संबंधित ग्राहकाने पुड्यांची मागणी केल्यानंतर पानमसाला आणि सुगंधी तंबाखू अशा दोन पुड्या त्यांच्या हातात टेकविल्या जातात. या दोन पुड्यांचे मिश्रण एकत्र करून त्यापासून तयार होणारा गुटखा सहजपणे खाल्ला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news