

पाटस : पुढारी वृत्तसेवा : पाटस (ता. दौंड) येथील टोलनाक्यावर ट्रकचालक टोल न भरता टोलची लेन तोडून गेला. यावेळी बॅरिकेड्स आडवे लावल्याचा राग मनात धरून हा ट्रकचालक थोड्या वेळात आपल्या ट्रक मालकाला सोबत घेऊन टोल नाक्यावर आला. यावेळी त्याने कर्मचार्याच्या पोटाला धारधार शस्त्र लावत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वरवंड येथील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षद (पूर्ण नाव माहीत नाही), संदीप गवळी आणि प्रदीप गवळी (दोघे रा. वरवंड) अशी संशयितांची नावे असल्याची माहिती पाटस पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विनोद बाळासो भंडलकर (वय 34, रा. अंबिकानगर पाटस) हे सोमवारी (दि. 5) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पाटस (ता. दौंड) येथील टोल नाक्यावर लेन मार्शल पदावर काम करत होते. यावेळी विना क्रमांक लाल रंगाचा एक ट्रक सोलापूरकडून पुण्याकडे भरधाव वेगाने आला. या ट्रकने टोलवर येऊन टोल लेनचा बुम तोडला व टोल न भरता पुढे आणला. यावेळी भंडलकर यांनी ट्रकला थांबविण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यात ते अपयशी ठरले.
त्यानंतर सायंकाळी दुचाकी(एमएच 42 एई 5708)ने तिघे जण टोल नाक्यावर येऊन त्यातील एकाने विनोद भंडलकर यांच्याशी वाद घालत त्यांच्या पोटाला गुप्ती लावून धमकी दिली. विनोद भंडलकर यांनी याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे करीत आहेत.