

पुणे : महापालिका हद्दीतील अनियमित बांधकामे नियमित करण्यासाठी राबविण्यात आलेल्या गुंठेवारी योजनेची प्रक्रिया किचकट असून, त्यासाठीचे शुल्क अवाजवी आहे. त्यामुळे गुंठेवारी करण्यासाठी नागरिक पुढे येत नसल्याने शासनाने गुंठेवारी प्रक्रिया सुटसुटीत करावी तसेच त्यासाठीचे शुल्क नागरिकांना परवडणारे असावे, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीत पुणे मनपा सरसकट सर्व अनधिकृत बांधकामांबाबत कारवाई नोटीस देत आहे. ही बाब गुंठेवारीअंतर्गत नियमित होऊ शकणार्या बांधकामधारकांवर नैसर्गिक न्याय्यतत्त्व अन्वये अन्यायकारक आहे. गुंठेवारी प्रकरणांसाठी झोननिहाय स्वतंत्र यंत्रणा तातडीने उभी करण्यात यावी.
टीडीआर तपासणीसाठी मनपाने उभारलेल्या ऑनलाईन यंत्रणेच्या धर्तीवर गुंठेवारी प्रकरणेदेखील ऑनलाईन पद्धतीने स्वीकारून जलदगतीने नागरिकांची बांधकामे कायद्याच्या चौकटीत नियमित करावीत. शासनानेच पुढाकार घेऊन गुंठेवारी कायद्यात नागरी हिताच्यादृष्टीने सुधारणा कराव्यात.