

वेल्हे: अल निनोच्या प्रभावामुळे पावसाळा लवकर संपला असला, तरी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या राजगड तालुक्यातील तोरणागडाच्या पायथ्याशी असलेल्या धानेप (ता. राजगड) येथील गुंजवणी धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे.
बुधवारी (दि. २५) धरणात ३.२० टीएमसी म्हणजेच ८६.६६ टक्के पाणीसाठा होता. या पाण्याचा लाभ राजगड, भोर आणि पुरंदर तालुक्यांतील ५० हजारांहून अधिक नागरिकांना पिण्यासाठी, तसेच शेकडो हेक्टर शेती आणि फळबागांना होत आहे. दुष्काळी परिस्थितीतही धरणाच्या लाभक्षेत्रातील निम्म्याहून अधिक शेती तग धरून असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सध्या धरणाच्या वीजनिर्मिती प्रकल्पाच्या सांडव्यातून रब्बी आवर्तनासाठी २५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्याचा कानंदी व गुंजवणी नदीपात्रातील २५ हून अधिक लहान-मोठ्या बंधाऱ्यांना तसेच पुरंदर तालुक्यातील वीर धरणाला लाभ होत आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मितीही सुरू आहे.
गुंजवणी धरण प्रकल्पाचे शाखा अभियंता नयन गिरमे म्हणाले, 'कालवा सल्लागार समितीच्या आदेशानुसार धरणातून २५० क्युसेक वेगाने रब्बी आवर्तनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी वीर धरणात जात असून, नदीवरील बंधारे आणि तलावही भरत आहेत. याचा भोर, राजगड आणि पुरंदर तालुक्यांतील नागरिकांना पिण्यासाठी तसेच शेती व फळबागांसाठी लाभ होत आहे.'
पाणीसाठा राखून ठेवण्याचे नियोजन
गुंजवणी धरणाची पाणी साठवण क्षमता ३.६९ टीएमसी आहे. यंदा पावसाळा लवकर संपल्याने पाण्याची बचत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नोव्हेंबर अखेरीसही धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे.
आगामी पावसाळा सुरू होईपर्यंत, ऑगस्ट २०२७ पर्यंत तीन तालुक्यांतील शंभरहून अधिक गावांची तहान भागवण्यासाठी धरणात पिण्याचे पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरणाच्या माथ्यावर १ हजार ९८९ मिलिमीटर पावसाची नोंदझाली आहे.