

पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील मुख्य बाजार आवारामध्ये मासळी बाजार सुरू करण्याचा बहुचर्चित प्रकल्प अखेर गुंडाळण्यात आला. गुरुवारी (दि. 8) बाजार समितीच्या कार्यालयात प्रशासन व मासळी व्यापारी यांच्या झालेल्या बैठकीत मासळी बाजार गुलटेकडीऐवजी आवाराबाहेर उभारण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला.
या निर्णयाचे स्थानिक रहिवासी आणि व्यापार्यांनी स्वागत केले आहे. मात्र, संचालक मंडळाने राजकीय आणि व्यापार्यांच्या दबावापोटी हतबल होऊन हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. होलसेल मासळी विक्री व्यापारी संघाने गुलटेकडी येथील बाजार समितीच्या आवारात मासळी बाजार उभारण्याचा प्रस्ताव 2023 मध्ये बाजार समितीला दिला होता. समितीने हा ठराव मंजूर केला होता. हा प्रकल्प रद्द करण्यासाठी स्थानिक रहिवासी आणि व्यापार्यांनी मोर्चा काढून विरोध केला होता. (Latest Pune news)
त्यानंतर याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. 13 जानेवारी 2025 रोजी उच्च न्यायालयाने होलसेल मासळी विक्री व्यापारी संघाच्या बाजूने निकाल देऊन बाजार समितीच्या आवारात मासळी बाजार उभारण्याची सूचना केली होती. त्यानंतर अद्याप कार्यवाही झाली नव्हती. मुख्य बाजार आवारातील घटकांचा तसेच स्थानिक रहिवाशांचा विरोध असल्याने बाजार समितीने याप्रकरणी गुरुवारी बैठक आयोजित केली होती.
बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, सचिव डॉ. राजाराम धोंडकर, संचालक प्रकाश जगताप, संचालक संतोष नांगरे, सहसचिव जी. सी. जेधे, एम. एन. पठारे, मासळी संघाचे कार्याध्यक्ष संतोष परदेशी, विजय परदेशी, सुनील परदेशी, अंबरनाथ परदेशी, शेखर परदेशी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बाजार समितीच्या आवारातील मासळी बाजाराचा प्रकल्प रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय बाजार समितीने घेतला.
बाजार आवारातील घटकांचा तसेच स्थानिक रहिवाशांचा विरोध असल्याने मार्केट यार्ड येथील जागेत मासळी बाजाराचा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. शहरातील अन्य पर्यायी जागा मासळी विक्री व्यापारी संघाने सुचविल्यास तिथे मासळी बाजार उभा करून त्याचे नियमन करण्यात येईल.
- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
उच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिल्यानंतर बाजार समितीच्या आवारात मासळी बाजार उभारणे अपेक्षित होते. स्थानिक रहिवासी, व्यापारी आणि राजकीय लोकांच्या दबावापोटी प्रकल्प अचानक रद्द करण्यात आला आहे. अन्य जागेत मासळी बाजार उभारण्याचा तोडगा आम्हाला स्वीकारावा लागत आहे. याबाबत महिनाभरात कार्यवाही झाली नाही, तर पुढील दिशा ठरवू.
- संतोष परदेशी, कार्याध्यक्ष, मासळी विक्री व्यापारी संघ