बिपरजॉयमुळे गुजराती जांभळे बाजारातून गायब

बिपरजॉयमुळे गुजराती जांभळे बाजारातून गायब

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  गुजरातमधील जांभूळ उत्पादक क्षेत्राला बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने बाजारात या जांभळांची आवक ठप्प झाली आहे. बाजारात पुणे विभागासह कर्नाटकातून जांभळे दाखल होत आहेत. मात्र, मागणीच्या तुलनेत ही आवक कमी असल्याने गत वर्षीच्या तुलनेत जांभळांच्या भावात किलोमागे वीस ते चाळीस रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारात जांभळांची 80 ते 140 रुपये प्रतिकिलो दराने विक्री सुरू आहे.

गुलटेकडी मार्केट यार्डात दरवर्षी राज्याच्या विविध भागांसह कर्नाटक, गुजरात आदी राज्यांतून जांभळांची आवक होते. या काळात जांभळांना मागणीही वाढून त्यांना चांगले दर मिळतात. सुरुवातीच्या टप्प्यात पुणे विभागातून चांगल्या प्रमाणात जांभळे बाजारात दाखल होत होती. मात्र, त्यामध्ये खंड पडला. त्यानंतर कर्नाटकातून जांभळांची आवक सुरू झाली. या जांभळांवर खड्डे पडल्याने त्याच्या दर्जात मोठी घसरण झाली होती. पुणे विभागातून अपेक्षित आवक न झाल्याने ग्राहकांचा नाइलाजास्तव या जांभळांच्या खरेदीकडे कल वाढला. दरम्यान, गुजराती जांभळांची आवक सुरू झाली. त्याचवेळी बिपरजॉय चक्रीवादळाने तडाखा दिल्याने येथून होणारी आवकही ठप्प झाल्याने कर्नाटक भागासह पुणे विभागातील जांभळांना चांगलाच भाव आला आहे.

महिनाभर चाखा जांभळांची चव

कर्नाटकातील जांभळांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, तो आणखी पंधरा दिवस राहील, तर पुणे विभागातून दाखल होणार्‍या जांभळांचा हंगाम महिनाभर सुरू राहील. बिपरजॉयमुळे गुजराती जांभळांचा हंगाम जवळपास संपल्यातच जमा आहे. वादळामुळे जांभळांचा दर्जा घसरल्यानंतर ती बाजारात आणणे शेतकर्‍यांना परवडणारे नाही. तसेच, यादरम्यान तेथील पल्प उत्पादक कंपन्या अशा जांभळांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याची शक्यता व्यापारीवर्गाकडून व्यक्त करण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news