

पुणे: गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, राडारोडा उचलून रस्ते मोकळे करावेत, तसेच मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जागा व्यापली असेल, तर काही भाग मोकळा करावा, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिल्या. महापालिका, पीएमआरडीए आणि महामेट्रो या तिन्ही यंत्रणांना सूचना दिल्या असल्याची माहिती पवार यांनी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात विविध शासकीय विभागांच्या बैठका पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, ‘काही गणेश मंडळांनी सकाळी सात वाजता विसर्जन मिरवणुकीस सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Pune News)
पुण्याच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून, दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. त्यामुळे मानाच्या गणपतींचा मान राखून आणि सर्व मंडळांशी संवाद साधूनच समन्वयातून मार्ग काढण्यात येईल.’
वाहतूक कोंडीबाबत पवार म्हणाले, जशी जशी विकासकामे होत आहेत, त्यानुसार रस्ते व उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले होत आहेत. मात्र पावसामुळे व वाढत्या गर्दीमुळे कोंडी होते. लोकांचा त्रास कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत फ्लेक्स व बॅनर तातडीने हटवावेत, असे आदेश पवार यांनी दिले.
मेट्रो प्रवाशांसाठी सुविधा
गणेशोत्सव काळात पुण्यात दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या सोयीसाठी मेट्रोसेवा रात्री दोन वाजेपर्यंत सुरू राहिल. तसेच कोणत्या स्टेशनवर उतरावे व कोणत्या स्टेशनवर चढावे, याबाबत स्पष्ट मार्गदर्शन करणारे फलक लावण्याच्या सूचना मेट्रो प्रशासनाला दिल्याचे पवार यांनी सांगितले.
जालना येथे एका नागरिकाला पोलिस अधिकार्याने लाथ मारल्याच्या घटनेबाबत विचारले असता पवार म्हणाले, “पोलिसांनी लाथ मारायची नसते. कायदा कोणीही हातात घ्यायचा नसतो. पोलिसांची नियमावली ठरलेली आहे आणि त्यानुसारच कारवाई होईल. कायद्याची अंमलबजावणी करणार्या यंत्रणांनी माणुसकी जपून काम करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.