

बावडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : द्राक्षांची बाजारात वाढलेली आवक व अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे बेदाणे व्यापार्यांकडून द्राक्ष खरेदीसाठी केली जात असलेली टाळाटाळ, यामुळे द्राक्षांचे भाव गडगडले आहेत. हतबल द्राक्ष उत्पादन शेतकरी व विक्रेते हे सध्या गावोगावी टेम्पोतून द्राक्षांची ग्राहकांना स्वस्त दराने विक्री करीत असल्याने स्वस्तातील द्राक्ष घेण्यासाठी झुंबड लागली आहे.
बावडा येथे शनिवारी (दि.29) भोसे (ता.पंढरपूर) परिसरातून टेम्पोतून आणलेली द्राक्षे पन्नास रुपयाला दीड किलो, तर शंभर रुपयाला 3 किलो या कवडीमोल भावाने विकली जात होती. पंढरपूर तालुक्यात द्राक्षबागा मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे द्राक्ष सध्या शिल्लक आहेत.
अवकाळी पावसामुळे बेदाणे व्यापारी सौदा करून ही द्राक्ष उचलत नसल्याने आम्ही गावोगावी टेम्पोतून द्राक्ष नेऊन विक्री करीत आहोत. गेल्या आठवड्यात तर द्राक्षांचे भाव पार कोसळले होते. मात्र चालू आठवड्यात भावामध्ये थोडी वाढ झाल्याचे भोसे येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याने सांगितले. थेट ग्राहकांना द्राक्ष विकल्याने आम्हास थोडाफार भाव वाढवून मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.