Manoj Jarange Patil | पुण्याच्या वेशीवर मनोज जरांगे यांचे जंगी स्वागत

नसरापुर, खेड शिवापूर टोलनाक्यावर फुलांची उधळण
manoj jarange in pune
पुण्याच्या वेशीवर मनोज जरांगे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. file photo
Published on
Updated on

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर आणि सांगलीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची जनजागृती शांतता फेरी पुण्यात दाखल होत आहे. तत्पुर्वी त्यांचे विविध ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.

सातारा येथून सकाळी दहाच्या सुमारास मनोग जरांगे यांनी पुण्याकडे प्रस्थान केले. महामार्गावर ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. पुणे जिल्ह्याच्या हद्दीत नसरापुरसह खेड शिवापूर टोल नाक्यावर फुलांची उधळण करण्यात आली. पुणे शहराच्या वेशीवर म्हणजेच कात्रज येथे मराठा सेवकांकडून जंगी स्वागत करण्यात आले. क्रेनच्या माध्यमातून मोठा हार परिधान करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कात्रज येथील स्वागत प्रसंगी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, राजकारणातील वळुंना कात्रजचा घाट दाखवण्याची वेळ आली आहे. मराठ्यांची ताकद काय असते ते दाखवून देऊ. माझी तब्येत बरी नसतानाही मोर्चात सहभागी झालो आहे. हे फक्त तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार; मराठ्यांना आरक्षण मिळवूनच देणार, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या जनजागृती शांतता रॅलीला सारसबाग येथून सुरुवात होणार आहे. या रॅलीसाठी पुणे शहरसह जिल्ह्यातून अनेक मराठा बांधव सारसबाग येथे उपस्थित झाले आहेत. गळ्यात भगवे उपरणे, डोक्यात भगवी टोपी आणि हातात भगवा झेंडा अशा वेशासह तेथील सर्वच परिसर भगवामय झाला आहे. एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. त्याबरोबरच ढोल-ताशांचा गजरही सुरु आहे.

असा आहे रॅलीचा मार्ग

सारसबाग येथील गणपतीचे दर्शन घेऊन बाजीराव रस्ता, शनिवारवाडा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास अभिवादन करून बर्वे चौकातून फेरी जंगली महाराज रस्त्याने पुढे जाणार आहे. डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास अभिवादन केल्यानंतर खंडूजी बाबा चौकात फेरीची सांगता होणार आहे.

राज्यात राडा, मात्र पुण्यात मनसे-शिवसेना एकत्र

सध्या राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा सुरु आहे. तर दुसर्‍या बाजुला मनोज जरांगे यांच्या जनजागृती शांतता रॅलीच्या निमित्ताने पुण्यात मात्र या दोन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्ते एकत्र आल्याचे पहायला मिळाले. राज्यात राडा मात्र पुण्यात मनसे-शिवसेना एकत्र दिसून येत आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी सर्वच पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.

manoj jarange in pune
Manoj Jarange | मराठ्यांना आरक्षण मिळू नये हीच सरकारची भूमिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news