खरिपातील धान्योत्पादन 41 लाख टनांनी घटणार

खरिपातील धान्योत्पादन 41 लाख टनांनी घटणार
पुणे : राज्यातील खरीप हंगामातील पिकांना कमी झालेल्या पावसाचा मोठा फटका बसला असून, धान्योत्पादनात 40 लाख 95 हजार टनाएवढी मोठी घट येण्याचा प्राथमिक अंदाज कृषी आयुक्तालयाने वर्तविला आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा अन्नधान्य व तेलबियांचे उत्पादन 27 टक्क्यांनी घटणार असल्याचे सांगण्यात आले. मूग, उडीद आणि बाजरीच्या उत्पादनात गतवर्षीपेक्षा सुमारे तीस ते पन्नास टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे.
खरिपामध्ये ऊस पीक वगळून सुमारे 142 लाख हेक्टरवरील पिकांच्या पेरण्यांचे नियोजन कृषी विभागाने केले. त्यापैकी प्रत्यक्षात 141 लाख 27 हजार 61 हेक्टर (99 टक्के) क्षेत्रावर पेरण्या झाल्या. कृषी विभागाकडून पिकांच्या उत्पादनाचे पूर्वानुमानाचे तीन नजरअंदाज काढले जातात आणि पीक कापणी प्रयोगानुसार अंतिम उत्पादन अहवाल तयार केला जातो. त्यानुसार यंदाच्या खरीप पिकांच्या उत्पादनाचा प्रथम अंदाज कृषी आयुक्तालयाने केंद्र सरकारला नुकताच पाठविला आहे. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

भात पिकाची स्थिती समाधानकारक

राज्यात खरिपात भात पिकाची 15 लाख 30 हजार हेक्टरवर लावणी पूर्ण झाली असून, भात पीक क्षेत्रात पावसाची स्थिती तुलनात्मकद़ृष्ट्या चांगली राहिली. त्यामुळे उत्पादनात फारसा फरक न पडता 34 लाख 48 हजार टनांइतके उत्पादन हाती येण्याचा अंदाज आहे. तर, मूग, उडीद आणि बाजरीच्या उत्पादनात गतवर्षीपेक्षा सुमारे तीस ते पन्नास टक्क्यांनी घट अपेक्षित असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

कापसाचे उत्पादन 10 टक्क्यांनी घटणार

कापूस पिकाचे गतवर्ष 2022-23 मध्ये 42 लाख 29 हजार हेक्टरवर पेरणी झाली. तर, 84 लाख 13 हजार गाठींइतके उत्पादन हाती येऊन सरासरी प्रतिहेक्टरी उत्पादकता 338 किलो मिळाली होती. तर, यंदाच्या खरीप 2023-24 मध्ये कापसाची 42 लाख 22 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर, 75 लाख 73 हजार गाठींइतके उत्पादन हाती येण्याचा प्रथम अंदाज असून, प्रतिहेक्टरी उत्पादकता सुमारे 305 किलोइतकी हाती येईल. कापसाचे उत्पादन 8 लाख 40 हजार गाठीने (10 टक्के) घट अपेक्षित आहे.
खरीप हंगामातील पिकांचे दोन वर्षांतील तुलनात्मक उत्पादन स्थिती. (उत्पादन-लाख मे.टनात)
पीक 2022-23 2023-24 प्रथम उत्पादनातील
– 3 रा अंदाजनजर अहवालघट
अन्नधान्य 82.55 62.66 19.89
तेलबिया 68.06 47.00 21.06
एकूण 150.61 109.66 40.95
(27 टक्के घट)
यंदाच्या खरीप हंगामात पावसाला उशिरा सुरुवात झाली. त्यानंतर पावसात खंड पडला. त्याचा परिणाम होऊन मूग, उडदाचा पेराच घटल्याने उत्पादनात घट येणार, हे स्पष्टच होते. सप्टेंबर महिन्यात पावसाने पुन्हा चांगली हजेरी लावल्यामुळे काही पिकांच्या उत्पादनाची स्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. तर, काही ठिकाणी अतिवृष्टीने नुकसानही झाल्याचे समोर आले आहे.
– दिलीप झेंडे, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण),कृषी आयुक्तालय, पुणे
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news