बावडा : पुढारी वृत्तसेवा : ज्वारी, बाजरी, गहू या धान्याचे किरकोळ विक्रीचे भाव गेल्या काही महिन्यांपासून उच्चांकी पातळीवर गेले आहेत. वाढत्या महागाईची आर्थिक झळ सर्वसामान्य जनतेला सहन करावी लागत आहे. रब्बी हंगामातील नवीन पीक बाजारात येईपर्यंत धान्यांचे भाव कमी होण्याची शक्यता नसल्याने गरिबांची भाकरी महागल्याचे चित्र आहे. ज्वारीचा किरकोळ भाव प्रतिकिलोस रु. 40 ते 45, बाजरीचा प्रतिकिलोस रु. 30 तर गव्हाचा भाव रु. 35 ते 36 च्या आसपास गेला आहे. चालू रब्बी हंगामामध्ये इंदापूर तालुक्यासह आसपासच्या तालुक्यात व जिल्ह्यातही ज्वारी, गहू पिकाच्या क्षेत्रात घट झाली आहे.
परिणामी आगामी काळातही ज्वारी, गव्हाचे भाव फारसे कमी होण्याची शक्यता नसल्याचे शेतकरी रमजान शेख (बावडा), प्रतिक घोगरे (गणेशवाडी-बावडा), सचिन माने (कचरवाडी-बावडा) यांनी सांगितले. पूर्वी बाजरी, ज्वारी हे गरिबांचे अन्न होते, मात्र वाढत्या दरामुळे ते श्रीमंतांचे अन्न झाले आहे, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, ज्वारी, बाजरीचे पीक हे वाढत्या उत्पादन खर्चामुळे परवडत नसल्याने या पिकाखालील क्षेत्रावर शेतकरी नगदी पिके घेत आहेत, त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ज्वारी, बाजरीच्या पिकाखाली क्षेत्रात पुणे, अहमदनगर, सोलापूर आदी जिल्ह्यांमध्ये घट होत चालली आहे. परिणामी स्थानिक बाजारामध्ये ज्वारी, बाजरीची आवक घटल्याचे योगेश गांधी (निरवांगी ), स्वयंम दोशी (बावडा) या व्यापार्यांनी सांगितले.