

Pending Vacancies
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्त्वावरील रखडलेल्या जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अनुकंपा तत्त्वारील चतुर्थश्रेणीतील जागा भरल्या जाणार आहेत. ज्यामध्ये राज्यभरातील जवळपास 9 हजार 658 जागा आहेत. ही प्रक्रिया येत्या 15 सप्टेंबर 2025 पासून जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाणार आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुकंपा तत्त्वावरील एवढी मोठी पदभरती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चतुर्थश्रेणीतील भरती ही खासगी कंत्राटदाराकडून केली जाते. परंतु, अनुकंपावरील जेवढ्या जागा आहेत त्या भरल्या जाणार असल्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतला आहे. परिणामी, प्रतीक्षेत असलेल्या सुमारे 10 हजार उमेदवारांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. राज्य सरकारने अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती प्रक्रियेत अनेक सुधारणा करून मृत शासकीय कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यातील शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्यांचे सेवेत असताना निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबातील पात्र वारसाला त्या विभागात नोकरी देण्याची तरतूद अनुकंपा धोरणात आहे. हे धोरण 1973 पासून लागू आहे आणि त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. या धोरणानुसार गट-क आणि गट-ड मधील पदांसाठी कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना ही सवलत मिळते. अनुकंपा तत्त्वावरील पदभरतीमध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमधील एकूण 9 हजार 568 उमेदवार प्रतीक्षेत आहेत.
यापैकी सर्वाधिक 5 हजार 228 उमेदवार हे महानगरपालिकांमधील, 3 हजार 705 जिल्हा परिषदांमधील, तर 725 उमेदवार नगरपालिकांमधील आहेत. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 506 उमेदवार प्रतीक्षेत असून, त्यानंतर पुणे 348, गडचिरोली 322 आणि नागपूर 320 यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे या पदभरतीच्या निर्णयाचा संबंधितांना फायदा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.