

पुणे/हडपसर; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवरायांच्या काळापासून, पाण्याचे स्रोत आहेत. ते आजही प्रेरणादायी असून प्रत्येक माणसाला पाणी मिळणे त्याचा हक्क आहे. या अनुषगांने राज्यातील सरकार प्रत्येकाच्या घरात नळ आणि पिण्याचे पाणी स्वच्छ देण्याच्या दृष्टीने कटिबध्द आहे, असे मत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. हडपसरमध्ये इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनचे (आयवा) तीन दिवसीय 55 व्या अखिल भारतीय वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक ऋषिकेश पानसे, पी. डी. भांबरे, के. एन. पाटे आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, राज्यात भूजल संरक्षणाचे काम सुरू असून, नैसर्गिक 2700 स्त्रोत शोधून कामासाठी मंजूर केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाण्यासाठी गड, किल्यावर खास सोय केली आहे. त्यामुळे आत्ताच्या ज्या काही योजना आहेत, त्या नवीन नाहीत.
महाराष्ट्रात शिवरायांनी पाण्यासाठी तलाव बांधलेले असून, ते आजही पाहायला मिळतात. देशाची पाणी समस्या सोडविण्यासाठी जलजीवन मिशन, घरघर शौचालय होण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हर घर नल, हर घर जल ही योजना देशभर राबविली जात असून, सगळीकडे जलजीवनचाच बोलबाला आहे.
पाणीपुरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल लखनौ येथील इंजि. अनिल कुमार गुप्ता यांना जलनिर्मलता, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथील डॉ. पराग सदगीर यांना जलसेवा, तर लखनौ येथील पल्लवी राय यांना युवा महिला अभियंता म्हणून ब्रिजनंदन शर्मा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दयानंद पानसे यांनी प्रास्ताविक केले. इंजि. राजेंद्र रहाणे यांनी आभार मानले.
भाऊ नको; पाणीवाला बाबा व्हायचंय
गुलाबराव पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत मला लोक प्रेमाने भाऊ म्हणतात. पण मला भाऊ व्हायचे नाही, तर मला पाणीवाला बाबा व्हायचे आहे. कारण पाणी पाजणे हे पुण्याचे काम असून, ते आपल्याला करायचे आहे. वर दाढीवाला, इथे मंत्री दाढीवाला आणि सचिवही दाढीवाला असे म्हणत केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मंत्री गुलाबराव पाटील आणि विभागात प्रधान सचिव संजीव जैसवाल अशी जोडी जमल्याची टिपण्णी केली.