बाल न्याय मंडळातील शासननियुक्त सदस्य चौकशीच्या फेर्‍यात!

बाल न्याय मंडळातील शासननियुक्त सदस्य चौकशीच्या फेर्‍यात!
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर परिसरात अपघातानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाला 300 शब्दांचा निबंध, तसेच पंधरा दिवस वाहतूक पोलिसांबरोबर काम करण्याचे आदेश देणार्‍या बाल न्याय मंडळातील शासन नियुक्त दोन सदस्यांची चौकशी करण्याचे आदेश महिला बाल कल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत. बाल न्याय मंडळात तीन सदस्य आहेत. त्यापैकी एक सदस्या विधी विभागाकडून नियुक्त केली जाते. उर्वरित दोन सदस्यांची शासनाकडून नियुक्ती केली जाते. शासन नियुक्त सदस्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. आठवडभरात या समितीकडून अहवाल येईल. अहवाल शासनाकडे पाठविल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.

कल्याणीनगरमध्ये संगणक अभियंता अनीश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना भरधाव मोटारीने धडक दिली. अपघातानंतर नागरिकांनी कारचालक अल्पवयीन मुलाला पकडले. चोप देऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. अल्पवयीन मुलगा बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालचा मुलगा असल्याचे उघडकीस आले. अपघातानंतर अल्पवयीनाला पोलिसांनी बाल न्याय मंडळापुढे हजर केले होते. मंडळाने त्याला जामीन मंजूर केला. त्याला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा दिली. आरोपी मोटारचालकाने 15 दिवस येरवडा वाहतूक शाखेतील पोलिसांसोबत चौकात उभे राहून वाहतुकीचे नियोजन करावे, दारू सोडवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत, अशा अटी, शर्तींवर बाल न्याय मंडळाने अल्पवयीन मुलाची मुक्तता केली होती.

अल्पवयीनाला ठोठावलेल्या शिक्षेप्रकरणी नागरिकांसह, विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अपघात प्रकरणातील मुलाची मुक्तता झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. पोलिसांच्या अर्जानुसार बाल न्याय मंडळाने अल्पवयीनाला 14 दिवस बालसुधारगृहात पाठविण्याचे आदेश नव्याने दिले होते. बाल न्याय मंडळाच्या सदस्यांनी पहिल्यांदा दिलेल्या निर्णयावर चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपीला निबंध लिहिण्याची शिक्षा ठोठावणे बाल न्याय मंडळाच्या अंगलट आले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news