

चाकण; पुढारी वृत्तसेवा : सहा जणांनी ट्रेलर अडवून ट्रेलर, त्यातील माल व इतर वस्तू असा एकूण 19 लाख 68 हजारांचा माल चोरल्याची घटना चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील आईसाहेब हॉटेलसमोर शेलगाव (ता. खेड) येथे गुरुवारी (दि. 8) पहाटे सव्वाचारच्या सुमारास घडली. याबाबत तुळशीराम चोरमरे (वय 33, रा. नागपूर) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहा अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादींच्या 10 लाख रुपये किमतीचा 16 टायर असलेल्या ट्रेलरमधून 9 लाख 60 हजार रुपये किमतीचे 32 टन लोखंडी अँगल आळंदी येथे कंपनीत उतरवण्यासाठी जात होते. त्यावेळेस एका लाल रंगाच्या मोटारीतून आलेल्या सहा अनोळखी इसमांनी रस्ता अडवून, तलवारीचा धाक दाखवून जबरदस्तीने फिर्यादी व त्याच्यासोबत असणार्या क्लीनर यांना ट्रेलरमधून खाली ओढून त्याच्या मोटारमध्ये बसवून मारहाण केली.
ट्रेलर चालकाच्या खिशातील 1600 रुपये रोख व 8000 रुपये किमतीचे मोबाईल फोन काढून घेतले. तसेच 6 लाख 60 हजार रुपये किमतीचा माल व 10 लाखांचा ट्रेलर लंपास केला. त्यानंतर फिर्यादी व क्लीनरला 3 ते 4 किलोमीटर अंतरावर दमदाटी करून सोडले. त्यानंतर सर्व जण पसार झाले. चाकण पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.