पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारचा 2024-25चा वार्षिंक अर्थसंकल्प मंगळवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यामध्ये पुणेकरांसाठी भरघोस तरतूद केल्याचे दिसून येत आहे. शिक्षण, आरोग्य, दळणवळणासह पयर्र्टनस्थळांसाठीही निधी दिला आहे. पुणे रिंगरोडसाठी दहा हजार कोटी, पुणे- लोणावळा रेल्वे मार्गासाठी 50 टक्के, बारामतीमधील शासकीय परिचर्या महाविद्यालय, पुण्यातील एम्स रुग्णालय व जुन्नर तालुक्यातील शिवसंग्रहालयासाठी निधीची तरतूद केली आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या 2024-25 च्या वार्षिक अर्थसंकल्पात बारामतीमध्ये शासकीय महाविद्यालयांशी संलग्न 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय नर्सिंग कॉलेज सुरू करणार असल्याची घोषणा केली. सध्या पुणे जिल्ह्यामध्ये केवळ बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न नर्सिंग कॉलेज कार्यरत आहे. राज्यात जळगाव, लातूर, बारामती, नंदुरबार, गोंदिया, कोल्हापूर आणि सांगली येथे वैद्यकीय महाविद्यालयांसह सात नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. बारामतीत नर्सिंग कॉलेज सुरू झाल्यास जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमधील परिचारिकांची कमतरता भरून निघणार आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या कल्पना कांबळे म्हणाल्या, पुणे जिल्ह्यात बी.जे.शी संलग्न असलेले एकमेव नर्सिंग कॉलेज आहे. कॉलेजमध्ये केवळ 50 सीट आहेत. सीटची संख्या वाढवून 100 करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. बीजेमध्ये सध्या चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. शासकीय नर्सिंग कॉलेजची वार्षिक फी 30 ते 40 हजार रुपये इतकी असते. तर, खासगी नर्सिंग कॉलेजची फी एक ते दीड लाख रुपये असते. जिल्ह्यात आणखी एक नर्सिंग कॉलेज झाल्यास परिचारिकांची कमतरता भरून निघेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) प्रस्तावित वर्तुळाकार रस्ता प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तब्बल दहा हजार 519 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. हा निधी भूसंपादनासाठी देण्यात आला असल्याने पूर्व मार्गाच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला असून, आता भूसंपादनाला गती मिळणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाकडून 172 किलोमीटर आणि 110 मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्व मार्गातील मावळ तालुक्यातून 11, खेड 12, हवेली 15, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांतून प्रस्तावित आहे.
तर पश्चिम मार्गावरील भोर तालुक्यातील एक, हवेली 11, मुळशीा 15 आणि मावळ तालुक्यातून सहा गावे बाधित होणार आहेत. पश्चिम मार्गावरील 34 गावांपैकी 31 गावांमधील 644 हेक्टर जमिनीच्या संपादनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी 2975 कोटी रुपये मोबदला दिला आहे. भोर तालुक्यातील पाच गावे वगळून शिवरे गावाचा समावेश झाल्याने या गावातील मूल्यांकनाचे दरनिश्चितीचे काम सुरू आहे. पश्चिम मार्गाच्या भूसंपादनासाठी यापूर्वीच गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळाकडून (हुडको) दहा हजार कोटींचे कर्ज घेण्यात आले आहे. या माध्यमातून पश्चिम मार्गाचे बहुतांश भूसंपादन मार्गी लागले आहे.
दरम्यान, पूर्व मार्गाच्या भूसंपादनासाठी रस्ते महामंडळाला निधीची गरज होती. त्यानुसार महामंडळाने राज्य सरकारकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनासाठी तब्बल दहा हजार 519 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे पूर्व मार्गाच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे- लोणावळा लोहमार्गाच्या तिसर्या व चौथ्या मार्गिकेला 2017 मध्ये मंजुरी मिळाली. मात्र, अद्यापपर्यंत हे काम प्रलंबित आहे. या मार्गिकेसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 2100 कोटी रुपयांची तरतूद केली होती; मात्र आता 7500 कोटींपर्यंत यावर खर्च करावा लागणार आहे. यामध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये प्रत्येकी 50 टक्के खर्चाची विभागणी होणार असून, राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात हा खर्च मंजूर केला आहे. पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी पुणे- लोणावळा लोहमार्गाच्या तिसर्या आणि चौथ्या मार्गिकेचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा बनला आहे. या दोन्ही शहरातून दररोज या मार्गावरून मुंबईला जाणार्या नागरिकांची संख्या पाच ते सहा हजारांहून अधिक असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. पुणे ते लोणावळा या लोहमार्गावर तिसर्या व चौथ्या मार्गिकेमुळे गाड्यांची संख्या वाढून प्रवाशांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता येईल. तसेच, लोकल गाड्यांच्या संख्येत वाढ होऊन, स्थानिक प्रवाशांचीही गैरसोय दूर होऊ शकेल.
– या मार्गिकेसाठी केंद्र आणि राज्य या दोघांमध्ये प्रत्येकी 50 टक्के खर्चाची विभागणी होणार आहे. राज्याच्या 50 टक्क्यांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला आर्थिक सहाय्य करावे लागणार आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी अर्थसंकल्पात जुन्नर तालुक्यात शिवसंग्रहालय उभारण्याची घोषणा केल्याने जुन्नर तालुक्याच्या पर्यटनवाढीला चालना मिळणार असल्याने जनतेने आनंद व्यक्त केला आहे. शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी वडजमध्ये उभारण्यात येणार्या शिवसंस्कार सृष्टीमध्ये हे संग्रहालय होणार आहे. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 12 फेब्रुवारीला मुंबईत होऊन या बैठकीत या प्रकल्पासाठी 44 एकर जमीन जलसंपदा विभागाने पर्यटन विभागाला देण्याचे ठरल्याने प्रकल्पासाठीच्या जागेचा प्रश्न मिटला आहे. आ. बेनके म्हणाले, या प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्यात पर्यटन वाढण्यास मदत होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी या कामाला सुरुवात होईल, असा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
औंधमध्ये नागपूरच्या धर्तीवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभारणार असल्याची घोषणा राज्य सरकारने मंगळवारी केली. यामुळे औंध जिल्हा रुग्णालय परिसरातील मोकळ्या जागेचा अनेक वर्षांनी वापर होणार आहे. एम्सच्या स्थापनेमुळे वैद्यकीय शिक्षणासह पुण्यात अत्याधुनिक सुपरस्पेशालिटी सुविधाही उपलब्ध होणार आहेत. ससून सर्वोपचार रुग्णालयावर दिवसेंदिवस रुग्णसेवेचा भार वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत आहे.
औंधला एम्स सुरू झाल्यावर रुग्णसेवेचा एकाच शासकीय रुग्णालयावर येणारा भारही हलका होणार आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवेसाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. औंध जिल्हा रुग्णालय परिसरात सुमारे 85 एकर जागा आहे. परंतु, ही विस्तीर्ण जागा वापराविना पडून आहे. या परिसरात सध्या 30 खाटांचे आयुष रुग्णालय सुरू होत असून क्रिटिकल केअरच्या 100 खाटांच्या रुग्णालय इमारतीचेही नुकतेच भूमिपूजन झाले. आता, या परिसरात एम्स उभे राहिल्यावर आरोग्य सेवेचा दर्जा सुधारू शकणार आहे.
सध्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था केवळ दिल्ली आणि नागपूरमध्ये कार्यरत आहेत. पुण्यामध्ये संस्था उभी राहिल्यास विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णांसाठी सुपरस्पेशालिटी सुविधा उपलब्ध होऊ शकतील.
– डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे विभाग
हेही वाचा